
Navi Mumbai Crime : वाढदिवसाच्या पार्टीत प्रियकराचा प्रेयसीवर रॉडने हल्ला
नवी मुंबई - प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. १५) रात्री एपीएमसीतील मॉलमधील एका हॉटेलमध्ये घडली. यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पकडून एपीएमसी पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. जखमी तरुणीला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी झालेली १७ वर्षीय तरुणी कुटुंबीयांसह कोपरखैरणेत राहण्यास असून हल्लेखोर तरुण साहिल लाड कर्जतमध्ये राहतो. तो जखमी तरुणीच्या भावाचा मित्र असून त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी नियमित जात असल्याने तिच्याशी मैत्री झाली होती. त्यांच्यात मागील वर्षभरापासून प्रेमसंबंध असल्याने तिला भेटण्यासाठी तो कर्जतमधून कोपरखैरणेत येत होता. याबाबतची माहिती तरुणीच्या मोठ्या बहिणीला समजल्यानंतर तिने साहिलशी बोलण्यास आणि त्याला भेटण्यास मनाई केली होती. त्यामुळे संतापलेल्या साहिलने तरुणीला दमदाटी करण्यास सुरुवात केली होती. या कारणास्तव तिने त्याच्याशी बोलणे बंद करत दुरावा निर्माण केल्याने तो चिडला होता.
बुधवारी रात्री पाम बीच गॅलेरिया मॉलमधील सेव्हन स्काय हॉटेलमध्ये मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीसाठी तरुणी गेली होती. या पार्टीत आलेल्या साहिलने प्रेयसीसह तिच्या बहिणीबरोबर हुज्जत घालून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे तरुणीच्या बहिणीने त्याच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर बहिणीसह तरुणी तेथून निघून जात असताना साहिलने त्याच्यासोबत आणलेल्या लोखंडी रॉडने प्रेयसीच्या डोक्यावर हल्ला केला. यात ती रक्तबंबाळ झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.