
श्वानाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा
डोंबिवली, ता. १६ : टेम्पोचालक वाहन पाठीमागे घेत असताना चाकाखाली पाळीव श्वान आल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल आहे. कल्याण पश्चिमेतील रामबाग गल्ली क्रमांक ३ मध्ये राहणारे केदार करंबेळकर (वय २६) यांनी एक श्वान पाळला होता. गेल्या आठवड्यात परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोच्या खाली श्वान जाऊन बसला होता. चालक सचिन दराडे याने वाहनाखाली पाहणी न करता टेम्पो सुरू करून तो मागे घेत होता. या वेळी श्वानाच्या पायावर टेम्पोचे चाक गेल्याने वेदनेने तो मोठ्याने विव्हळू लागला. त्याचा आवाज ऐकून केदार घराबाहेर आले. तोपर्यंत परिसरातील रहिवाशांनीदेखील आरडाओरडा करत चालकाला टेम्पो थांबवण्यास सांगितले होते. त्याकडे त्याने दुर्लक्ष करत टेम्पो चालवल्याने पुढील चाकदेखील श्वानाच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी केदार यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.