जे.जे. रुग्णालयात स्वच्छतेचे तीनतेरा

जे.जे. रुग्णालयात स्वच्छतेचे तीनतेरा

मुंबई, ता. १६ : परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ‘काम बंद’ संपाचा गुरुवारी तिसरा दिवस होता, मात्र या संपाचा सर्वाधिक परिणाम रुग्णसेवेवर झाला असून जे. जे. रुग्णालयाच्या स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. जागोजागी पाण्याच्या बाटल्या, अन्नपदार्थांचा कचरा, पुठ्ठे, कागद परिसरात पसरले आहेत. यासह शौचालयांमध्येही अस्वच्छता पसरली आहे. डॉक्टर्स उपचार करून निघून जात असले तरी अस्वच्छतेमुळे रुग्ण हैराण झाले आहेत. त्यामुळे किमान रुग्णांसाठी तरी हा संप मागे घ्यावा, असे आवाहन रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
----
आपत्कालीन विभागात शुकशुकाट
सामान्यतः जे. जे. रुग्णालयाचा आपत्कालीन विभाग भरलेला असतो, मात्र संप सुरू असल्याने आपत्कालीन विभागातही शुकशुकाट होता. शिकाऊ विद्यार्थी आणि डॉक्टर्स उपचार करत असले तरी परिचारिका नसल्याने रुग्णांकडे लक्ष देणारे कोणी नसल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, या संपाचा सर्वाधिक त्रास नातेवाईकांनाही होत आहे. फौझिया खान या आपल्या आईला एकट्याच या विभागातून त्या विभागात फिरवत होत्या. त्यांना विचारले असता कामगारांचे काम आपल्यालाच करावे लागत आहे. हा संप लवकर संपावा, जेणेकरून लोकांचे हाल कमी होतील. वॉर्ड बॉय उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनाच रुग्णांची ढकलगाडी करावी लागत आहे. अनेक ज्येष्ठ नातेवाईक आपल्या रुग्णाला स्ट्रेचरवरून ढकलताना रुग्णालय परिसरात दिसून आले. संप असल्याने एकही वॉर्ड बॉय हात लावत नसल्याचे नातेवाईक सांगतात.
---
एमआरआय बंद
सामान्यपणे जे जे रुग्णालयात दिवसाला २० ते २५ एमआरआय होतात, पण प्रशिक्षित तांत्रिक संपात सहभागी झाल्याने एमआरआय बंद आहे. दिवसभरात एखाद-दुसऱ्या डॉक्टरांच्या साह्याने एमआरआय केले जात आहे. ओपीडी आणि वॉर्डमधून एमआरआयसाठी फारसे रुग्ण पाठवले जात नसल्याने एमआरआय कक्ष बंद असल्याचे चित्र आहे.
---
शवविच्छेदन बंद
चतुर्थ श्रेणी कर्मचारीच नसल्याने रुग्णालयातील शवविच्छेदनही बंद ठेवण्यात आले आहे. कॅज्युएल्टी विभागामधूनच मृतदेह शवविच्छेदन विभागात पाठवले जात नाहीत. तसेच ज्या मृतदेहांना शवविच्छेदनाची गरज पडते, त्यांना केईएम रुग्णालयात पाठवले जाते. तसेच डॉक्टर्सही शवविच्छेदन लिहून देणे टाळत असल्याचे संपकरी चतुर्थ श्रेणी कामगार वर्गातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
---
विद्यार्थी पडले आजारी -
संपकरी परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सर्व भार सध्या डॉक्टर्स आणि शिकाऊ नर्सिंग विद्यार्थ्यांवर पडला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या ठराविक वेळेपेक्षा अधिक काम करावे लागत असल्याने हे विद्यार्थी आजारी पडल्याचे त्यांचे वरिष्ठ सांगतात. शिवाय वरिष्ठ परिचारिकांना पुन्हा लवकर कामावर रुजू व्हा, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे.
----
कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी
दरम्यान, लेखी आश्वासन मिळेपर्यंत आणि मागण्या मान्य होईपर्यंत हा संप मागे घेणार नसल्याचे सांगत गुरुवारी सकाळी परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी मिळून जे.जे. परिसरात रॅली काढली. शासनाविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, असे ही परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com