तलाव सुशोभीकरण कासवाच्या जिवावर

तलाव सुशोभीकरण कासवाच्या जिवावर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : रायलादेवी तलाव सुशोभीकरणाच्या कामात अक्षम्य हलगर्जी झाल्याने तीन कासवांना जीव गमवावा लागल्याची गंभीर बाब उघडकीस आली. त्यानंतर वन विभागापासून ते ठाणे महापालिका खडबडून जागी झाली आहे. आता डबक्यांमध्ये तग धरून असलेल्या ५० वर्षे जुन्या कासवांसह इतर दुर्मिळ कासव, मासे शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी १५ जणांचे पथक या मोहिमेत उतरले आहे.

मासुंदा तलावानंतर ठाणे महापालिकेने एमएमआरडीएच्या माध्यमातून वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरणाचे काम होती घेतले आहे. तलावाचा संपूर्ण गाळ काढून भोवताली टो वॉल बांधण्यात येणार आहे. याशिवाय जॉगिंग ट्रॅक, छोटे अ‍ॅम्पिथिएटर तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात रायलादेवी तलावाची शोभा वाढणार आहे. या कामामुळे तलावात आश्रयाला असलेल्या जलचरांचा जीव धोक्यात आला असल्याची बाब समोर आली आहे. प्रशासनाने सुशोभीकरणासाठी तलावातील पाणी काढून तलाव रिकामे केले; पण या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात मासे आणि कासव असल्यामुळे कंत्राटदाराने डबकी तयार केली आहेत. या डबक्यांमध्ये नियमित पाणी साठा करून देण्याची जबाबदारीही देण्यात आली होती, पण तसे न झाल्याने उन्हाच्या तडाख्यात डबके आटून त्यामधील मासे मृत झाल्याचे आढळून आले.

मृत माशांची दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांनी पर्यावरण मित्रांशी संपर्क साधला. वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता शेकडो मासे मृतावस्थेत आढळल्याची माहिती रोहित मोहिते यांनी दिली. तसेच जवळच्या डबक्यांमध्ये तीन कासवेही मृतावस्थेत दिसली. या घटनेने खळबळ उडाल्यानंतर आता वनविभाग आणि ठाणे महापालिकेने निसर्गमित्रांच्या मदतीने परिसरात कासवांची शोध मोहीम सुरू केली.

ठाणे महापालिकेला नोटीस
सुशोभीकरणाचे काम हाती घेताना ठाणे महापालिकेने काय खबरदारी घेतली, येथील जलचरांसाठी काय उपाययोजना केल्या, यासाठी शास्त्रीय सल्ला घेण्यात आला होता का, यासह अनेक प्रश्न उपस्थित करत वन विभागाने पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली. तसेच याबाबतीत खुलासाही मागितला असल्याची माहिती वन विभागाचे अधिकारी दिनेश देसले यांनी दिली.

वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा
आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला. काही विशिष्ट जातींचे कासव जे जगामध्ये काही भागांमध्येच शिल्लक राहिले आहेत, अशी कासवे येथे मृतावस्थेत सापडली आहेत. त्यामुळे ज्यांनी हे केले आहे, त्यांच्यावर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणी ट्विटरद्वारे आव्हाड यांनी केली.


सुशोभीकरणाचे काम हाती घेतलेल्या कंत्राटदाराला जलजीव सृष्टीची काळजी घेण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार तलाव परिसरात लहान-मोठी डबकी तयार करण्यात आली होती. तसेच तेथे नियमित पाण्याची व्यवस्थाही करण्याची सूचना दिली होती.
- मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com