
कोरोनाचे पुन्हा डोके वर
मुंबई, ता. १६ : मागील काही महिन्यांपासून मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने सर्वत्र दिलासा मिळाला होता. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्याही कमी झाली होती; मात्र मागील १४ दिवसांमध्ये शहरातील कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. या कालावधीत सक्रिय रुग्णसंख्या ४७ वरून १४४ म्हणजेच दोनशे टक्क्यांनी वाढल्याने आणि त्यातच ‘एच३एन२’चाही प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांना पुन्हा एकदा खबरदारी घ्यावी लागणार आहे.
१ मार्च रोजी मुंबईत कोरोनाचे ४७ सक्रिय रुग्ण होते. ती संख्या मंगळवारी (ता. १४) १४४ वर पोहोचली. म्हणजे गेल्या १४ दिवसांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्या निर्बंध शिथिल झाल्याने बरेच लोक प्रवास करत असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तसेच अॅडिनोव्हायरस आणि एच३एन२ सारख्या विषाणूजन्य संसर्गामुळे मुंबईकर आधीच आजारी पडत आहेत. सध्या कोरोनामुळे नव्याने कोणीही रुग्णालयात दाखल झालेले नाहीत. प्रामुख्याने सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. नागरिकांचे परदेश दौरे, हवामानातील बदलांमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरात कोरोना रुग्णांसाठी सध्या समर्पित ४,३५१ खाटा उपलब्ध आहेत आणि त्यापैकी केवळ सहा खाटांवर रुग्ण आहेत. आरोग्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यापैकी चार रुग्णांना सेव्हनहिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांचा प्रवास करण्याचे प्रमाण वाढले आहे. संसर्ग झालेल्यांना सौम्य लक्षणे आहेत आणि त्यापैकी बहुतेक रुग्णालयात दाखल न होता, तीन-पाच दिवसांत बरे होत आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, परंतु संसर्ग झाल्यास विलगीकरणात राहावे आणि पुरेशी काळजी घ्यावी.
- डॉ. प्रतित समदानी, वैद्यकीय तज्ज्ञ.