
सासरवाडीत चोरी करणारा जावई जेरबंद.
सासरवाडीत चोरी करणारा जावई जेरबंद
मानखुर्द, ता. १६ (बातमीदार) ः सासरवाडीत चोरी करणाऱ्या जावयासह त्याच्या साथीदारांना टिळकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली. पवन जाधव (वय ३२) असे त्याचे नाव असून अर्जुन शिंदे (वय २८) व किरण पोखारे (वय २४) यांच्या मदतीने त्याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अर्जुन सराईत गुन्हेगार असून त्याने पवनच्या सांगण्यावरून चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गालगत असलेल्या महात्मा फुले नगरातील सासू-सासऱ्यांच्या घरातून दागिन्यांची चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पवनचे सासू-सासरे गावी गेले होते. त्या वेळी पवनने अर्जुन व किरणला सोबत घेऊन त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि दीड लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास केले होते. त्याच्याविरोधात टिळक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर तिघांनी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी चोरलेले सोने वितळवून सोनाराकडून तयार केलेली लगडही पोलिसांनी जप्त केली आहे.