सिडकोचा क्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडकोचा क्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
सिडकोचा क्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सिडकोचा क्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : सिडकोच्या विमानतळ प्रकल्पातील मुख्य भूमी व भूमापन कार्यालयातील क्षेत्र अधिकाऱ्याला गुरुवारी (ता. १६) तीन लाखांची घेताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. मुकुंद चंद्रकांत बंडा (५७) याने सात लाखांच्या लाचेची मागणी केली होती. यातील पहिला हप्ता घेताना त्याला सिडको कार्यालयात सापळा लावून रंगेहात पकडण्यात आले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसाठी सिडकोने १० गाव व काही झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन केले आहे. प्रकल्पग्रस्तांना घराच्या मोबदल्यात सिडकोकडून भूखंडाची पात्रता निश्चित करून त्यांना भूखंड देण्यात येत आहेत. यातीलच एका प्रकल्पग्रस्ताने सिडकोच्या विमानतळ प्रकल्पातील मुख्य भूमी व भूमापन कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता; मात्र या कार्यालयातील अधिकाऱ्याने हा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवण्याकरिता क्षेत्र अधिकारी मुकुंद बंडा याने १५ लाखांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

पथकाने केलेल्या पडताळणीत मुकुंद बंडा याने प्रस्ताव मंजुरीकरिता स्वत:सह मनोज पाटील आणि सचिन वैती या सहकाऱ्यांसाठी सात लाख रुपयांची मागणी केल्याचे आढळून आले. त्यातील तीन लाखांचा पहिला हप्ता घेण्याचे कबूल केल्यावर पथकाच्या पोलिस उपअधीक्षक ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील गुरुवारी दुपारी सिडकोच्या कार्यालयात सापळा लावला होता. या वेळी बंडा याने तीन लाखांची रक्कम घेतल्यानंतर पथकाने त्याला रंगेहात पकडले.