पोलिस पथक गुजरातला रवाना

पोलिस पथक गुजरातला रवाना

नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : बांधकाम व्यावसायिक साहुजी मंजेरी (पटेल) यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचे अद्याप धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक कच्छ (गुजरात) येथे रवाना केले आहे; तर दुसरीकडे पोलिसांनी सीसी टीव्ही चित्रिकरणावरून मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

बेलापूर येथे राहणारे, मूळचे कच्छ भागातील साहुजी मंजेरी (पटेल) हे ‘इम्पेरिया ग्रुप’चे संचालक होते. बुधवारी (ता. १५) सायंकाळी ते कामानिमित्त नेरूळ सेक्टर ६ मध्ये गेले होते. यावेळी ते कारमध्ये बसल्यानंतर त्याठिकाणी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी कारचा दरवाजा उघडून त्यांच्यावर पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर दोघे मारेकरी पसार झाले. या गोळीबारात त्यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी घटनास्थळासह आजूबाजूच्या परिसरातील सीसी टीव्ही चित्रिकरण ताब्यात घेऊन त्यांची तपासणी सुरू केली आहे; मात्र ज्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला, त्याठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे नसल्याने गोळीबार करणारे मारेकरी कैद होऊ शकले नाहीत.

मारेकऱ्यांकडून हेल्मेटचा वापर
परिसरातील सीसी टीव्ही चित्रिकरणात मोटारसायकलवरून आलेले दोघे मारेकरी कैद झाले असले तरी त्यांनी हेल्मेट घातल्याने त्यांचे चेहरे यात कैद होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या हाती या घटनेतील मारेकऱ्यांचे कोणतेही धागेदोरे अद्याप लागलेले नाहीत.

कच्छसाठी पोलिस रवाना
साहुजी मंजेरी यांचा कच्छ येथील गावी कोणाशी वाद होता का, याचा तपास करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

बांधकाम व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण
नवी मुंबई शहरातील बांधकाम व्यावसायिकांवर यापूर्वीही गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी वाशी येथे दीपक वालेचा, डी. एस. राजन यांच्या हत्या झाल्या होत्या. अतुल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकावरदेखील गोळीबार झाला होता. मात्र त्या गोळीबारातून ते बचावले होते. घणसोलीतील प्रवीण विश्वनाथ तायडे यांच्यावर तीन वर्षांपूर्वी गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. घणसोलीतील नगरसेवक संजय पाटील यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता. नवी मुंबईतील गुन्हेगारांची दहशत संपल्याचे वाटत असतानाच पुन्हा एकदा मंजेरी यांच्या हत्या प्रकरणाने बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com