
आईची हत्येप्रकरणी रिंकल जैनला पोलिस कोठडी
मुंबई, ता. १६ : लालबाग परिसरात आईची हत्या केल्याप्रकरणी आरोपी मुलगी रिंकल जैनला मुंबईतील न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रिंपलने दोन महिन्यांपूर्वी आईची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी रिंकल जैनला मंगळवारी रात्री अटक केली होती. तिने आईची हत्या का केली, याचा तपास पोलिस करत आहेत.
मृत महिलेच्या भावांनी अनेक दिवसांपासून बहिणीशी संपर्क होत नसल्याने १४ मार्चला पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्या मुलीकडे वारंवार चौकशी करूनही प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ केली जात होती. अखेर त्यांनी काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी पोलिस चौकशीसाठी महिलेच्या घरी पोहोचले असता दुर्गंधीमुळे पोलिसांचा संशय बळावला. घरात तपासणी केल्यावर कपाटात प्लास्टिक पिशवीत बांधलेल्या अवस्थेत मृतदेहांचे तुकडे आढळले. या प्रकरणी चौकशी करून काळाचौकी पोलिसांनी मुलगी रिंकल जैनला अटक केली होती.
पोलिसांनी प्लास्टिकच्या पिशवीतून मृतदेह बाहेर काढला, तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता.
एवढेच नव्हे तर महिलेच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशिरा फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून संपूर्ण घराचा पंचनामा करण्यात आला. हत्येचे कारण उलगडण्यासाठी पोलिस रिंकलची चौकशी करत आहेत.