
रुग्णवाहिका चालकाला फेरीवाल्यांची मारहाण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : क्षुल्लक कारणावरून रुग्णवाहिका चालकाला दोन फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत गुरुवारी (ता. १६) दुपारी घडली. या घटनेमुळे फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.
डोंबिवली पूर्वेतील मधुबन टॉकीजसमोर एका खासगी रुग्णालयात गुरुवारी दुपारी एका रुग्णाला दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. चालक गणेश माळी (वय ३०) हा रुग्णवाहिका मागे घेत असताना एका लादीला वाहिकेच्या चाकाचा धक्का बसला. या कारणावरून तेथे चप्पल विक्री करणाऱ्या एका फेरीवाल्याने चालक गणेश याच्याशी वाद घातला. त्यानंतर दोघांनी शिवीगाळ करत त्याला भाजी मंडईच्या एका कोपऱ्यात नेले. तेथे दोघा फेरीवाल्यांनी चालकाला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये चालक गणेश याच्या हाताला मार लागला. तसेच झटापटीमध्ये त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून गहाळ झाली आहे. याप्रकरणी गणेशने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रामनगर पोलिसांनी दोघा संशयित फेरीवाल्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कारवाईनंतर पुन्हा बस्तान
कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पालिका प्रशासनास दिला आहे. त्यानंतर पालिकेने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर बुधवारी (ता. १५) कारवाई केली होती; मात्र काही तासांत फेरीवाले पुन्हा त्या ठिकाणी येऊन बसलेले दिसून आले. यामुळे पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. फेरीवाल्यांची दादागिरी वाढल्याचे गुरुवारच्या मारहाणीच्या घटनेमुळे स्पष्ट होत आहे.