
ठाण्यात वाहनाच्या धडकेत रेड्याचा जागीच मृत्यू
ठाणे, ता. १६ : मुंबई-नाशिक रोड, साकेत ब्रिजजवळ एका अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत एका रेड्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.१६) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास समोर आली. मृत रेड्याला हायड्रोलिक गार्बेज ट्रकमधून वागळे इस्टेट येथील सीपी तलाव नेण्यात आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
गुरुवारी सकाळी मुंबई-नाशिक रोड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच रोडच्या बाजूला मोकळी जागा असल्याने तेथे झाडेझुडपे वाढली असून गवतही असल्याने तेथे चरण्यासाठी गुरांची ये-जा सुरू असते. याचदरम्यान मृत रेडा नेहमीप्रमाणे येत असावा, त्यातच भरधाव वेगात जाणाऱ्या अनोळखी वाहनाने बहुदा रस्ता ओलांडणाऱ्या रेड्याला जोरदार धडक दिल्याने रेड्याचा रस्त्याच्या मध्यभागी पडून मृत्यू झाला असावा असा कयास लावला जात आहे. वाहनाने धडक दिल्याने रेड्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी पोलिस, वाहतूक विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, घनकचरा विभागाचे कर्मचारी दाखल झाले. यावेळी हायड्रोलिक गार्बेज ट्रक पाचारण केले होते. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व घनकचरा विभागाचे कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृत रेड्याला हायड्रोलिक गार्बेज ट्रकमधून सी.पी तलाव, येथे नेण्यात आले. त्याच्या मालकाचे नाव समजू शकलेले नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.