
रुग्णवाहिका चालक मारहाणप्रकरणी फेरीवाले अटकेत
डोंबिवली : मधुबन टॉकीज गल्लीत क्षुल्लक कारणावरून फेरीवाल्यांनी रुग्णवाहिका चालक गणेश माळी याला गुरुवारी (ता. १६) दुपारी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अशोक गुप्ता (वय ३१) आणि रोहित गुप्ता (वय २३) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. डोंबिवली पूर्वेतील स्थानक परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या जास्त असून त्यांची दिवसेंदिवस दादागिरी वाढत आहे. गुरुवारी दुपारी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रुग्णवाहिकेचे मागचे चाक पदपथाच्या एका कोपऱ्याला लागून तिथे लावण्यात आलेला कडाप्पा खाली पडला होता. यावरून फेरीवाले अशोक गुप्ता, रोहित गुप्ता यांनी चालक गणेश याला ‘तू कडाप्पा का पाडलास’ असा प्रश्न करून त्याला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने बेदम मारहाण केली. या घटनेचे सीसी टीव्ही चित्रीकरण प्राप्त झाल्यानंतर गणेश याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.