
आजपासून एसटीत महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत लागू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महाराष्ट्र राज्याच्या वर्ष २०२३-२४च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १७ मार्चपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते.
ज्या महिला चुल आणि मुल यापलीकडे जाऊन स्वतःच्या कौशल्यावर आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देऊ इच्छितात, परंतु अशा महिलांना केवळ वाढत्या प्रवासी खर्चामुळे घराबाहेर पडणं शक्य होत नव्हतं, अशा महिलांच्या पंखांना, त्यांच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने या योजनेमुळे बळ मिळणार आहे. म्हणून हा एक क्रांतिकारी निर्णय असून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे एक आश्वासक पाऊल आहे. यासाठी सरकारचे अभिनंदन.
- जयश्री भोसले, शिक्षिका, मुरगुड, कोल्हापुर.
आमच्या घरात मी माझे पती व आमच्या तीन मुली आहेत. आम्हाला गौरी-गणपती, होळीला, उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गावी सहकुटुंब तिकीटाच्या वाढत्या किंमतीमुळे जाणे शक्यच नव्हते, कोणीतरी एक-दोनजण कसेबसे जात असू. आता एसटीच्या तिकीट दरातील ५० टक्के सवलतीमुळे आम्ही चाकरमानी सहकुटुंब प्रत्येक सणाला कोकणात आमच्या गावी जाऊ शकतो.
- संचेता तावडे, विरार