
महारेराने १४ गृहनिर्माण प्रकल्पांना बजावल्या नोटिसा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महारेराच्या नोंदणी क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती करणाऱ्यांवर महारेराने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध वर्तमानपत्रांत महारेरा क्रमांकाशिवाय प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींची दखल घेत, महारेराने १४ प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीला योग्य प्रतिसाद न मिळाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही महारेराच्यावतीने सांगण्यात आले आहे.
नोटीस बजावलेल्या गृहनिर्माण प्रकल्पात मुंबईलगतचे ५, पुणे, नागपूरमधील प्रत्येकी ३, नाशिकमधील २ तर औरंगाबादच्या एका प्रकल्पाचा समावेश आहे. नोटीस मिळाल्यापासून त्यांची बाजू मांडण्यासाठी विकासकांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. चुकांची दुरुस्ती न करणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अनेक प्रकल्पांचा महारेरा नोंदणी क्रमांक असूनही त्याचा उल्लेख करण्याचे टाळले जात असल्याचा प्रकारही महारेराच्या निदर्शनास आला आहे. अशा प्रकल्पांना भविष्यात योग्य काळजी घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचे महारेराकडून सांगण्यात आले आहे. महारेरा नोंदणी क्रमांक असल्याशिवाय कुठल्याही विकासकाला प्रकल्पाची कुठल्याही प्रकारची जाहिरात, त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी विक्री किंवा खरेदी करता येत नाही. मात्र काही विकासक या नियमाकडे कानाडोळा करून महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय किंवा ‘महारेरा नोंदणीकृत’ असे लिहून प्रकल्पाच्या सर्रास जाहिराती करीत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे.
महारेराचे ग्राहकांना आवाहन
स्थावर संपदा कायद्यानुसार ५०० स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त किंवा ८ सदनिकांचा कुठलाही प्रकल्प असल्यास त्याची महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. आपली गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित राहावी यासाठी घर खरेदीदारांनी याची खातरजमा करणे गरजेचे आहे. त्यामुळे घरखरेदीदार आणि स्थावर संपदा क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी महारेरा नोंदणी क्रमांक नसलेल्या प्रकल्पांत गुंतवणूक करण्याचे टाळावे, असे आवाहनदेखील महारेराच्यावतीने करण्यात आले आहे. घर खरेदीदार, त्याची गुंतवणूक सुरक्षित राहावी तसेच त्याची फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने स्थावर संपदा अधिनियम लागू केला.