मुंबईची हवा बिघडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईची हवा बिघडली
मुंबईची हवा बिघडली

मुंबईची हवा बिघडली

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार मिहिर कोटेचा यांनी मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत लक्ष्यवेधी मांडली. जगात मुंबई हे सर्वात जास्त दुसरे प्रदूषित शहर आहे. मुंबईतील जवळपास ६० टक्के वायुप्रदूषण हे बांधकाम प्रकल्पांमुळे होत असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.

जानेवारी २०२१ मुंबईत पीएम २.५ चा दर्जा जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनाच्या ९ पट जास्त होता. तेव्हा वायुप्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला याबद्दल सूचनाही केल्या होत्या. त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे पर्याय वाढवणे, मुंबईत प्रदूषण करणाऱ्या बांधकामांवर धूळ नियंत्रण व्यवस्था राबवणे, जे बांधकाम प्रकल्प यांचे पालन करत नाही ते तात्काळ बंद करणे, या आणि इतर सूचनांचा समावेश होता. या वेळी आमदार मिहिर कोटेचा यांनी ठाकरे सरकारवर मेट्रो प्रकल्प रखडल्याप्रकरणी आणि ई-बस खरेदीवरून टीका केली.

आमदार कोटेचा यांनी मुंबईतील बांधकाम प्रकल्पांना शासनाकडून दिलेल्या पर्यावरणलक्ष्यी अटींचे पालन होत नसल्याचाही आरोप केला. यावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची त्यांनी मागणी केली. दरम्यान, या लक्ष्यवेधीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर देत वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावर शासन सकारात्मक असून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सर्वात जास्त प्रदूषण धुळीकणांमुळे
------------
मुंबईतील वायुप्रदूषण हे वाढत्या धुळीकणांमुळे असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. यासाठी संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठीत केल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्यावर होणारी धूळ आणि बांधकाम प्रकल्पामुळे होणारी धूळ यावर लवकरच बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.