
बंद कंपनीमधील लोखंडावर चोरट्यांचा डल्ला
वाडा, ता. १८ (बातमीदार) : बंद पडलेल्या कंपनीतील भंगार चोरून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन ट्रक व एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. वाडा तालुक्यातील दिनकर पाडा येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनकर पाडा या गावात प्रतिभा पाईप ही कंपनी असून गेल्या अनेक वर्षापासून ही कंपनी बंद आहे. या बंद असलेल्या कंपनीत लोखंडी शेड व विद्युत मोटारी, मशिनरी गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्याचे तुकडे करून ते गुरुवारी रात्री हायड्राच्या सहाय्याने लोखंडी भंगार सामान कंटेनरमध्ये टाकून चोरीला जात असल्याची माहिती येथील ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर ग्रामस्थांनी येथे सापळा रचला असता लोखंडी भंगार भरलेल्या तीन ट्रकसह दोन क्रेनला पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. अंधाराचा फायदा घेत एक ट्रक ग्रामस्थांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरली आहे. मुन्ना शेख या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कुडूस पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक विलास जाधव अधिक तपास करत आहेत.