
मुंबईत दोन दिवसीय जी-२० परिषद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : जी-२० परिषदेचे मुंबईत पुन्हा आयोजन करण्यात आले असून २८ ते ३० मार्च या कालावधीत ही परिषद होणार आहे. जी २० परिषदेत देश-विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. दोनदिवसीय परिषदेपूर्वी मुंबईतील रस्ते पुन्हा एकदा चकाचक होणार असून सुशोभीकरण केले जाणार आहे. पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी संबंधित विभागांना कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी डिसेंबर २०२२मध्ये संपन्न झालेल्या जी २० परिषदेच्या पहिल्या बैठकीप्रमाणेच याही बैठकीची बहुतांश ठिकाणे आणि अभ्यागतांची निवास व्यवस्था असणारी हॉटेल्स कायम आहेत. त्यामुळे सर्व संबंधित मार्गांवर रस्ते देखभाल आणि इतर आवश्यक कामे वेळेत पूर्ण करावीत, अभ्यागतांसाठी वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेची उपलब्धता राहील, याची काळजी घ्यावी आदी सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. या सर्व कामांची पाहणी आणि रंगीत तालीम २५ मार्च रोजी घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी नमूद केले.
--
३२० कामांचा आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबईचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. याआधी ५०० कामे हाती घेतली आहेत; तर दुसऱ्या टप्प्यात ३२० कामे हाती घेण्यात आली असून यातील काही कामे सुरू झाली आहेत. या सगळ्या कामांचा आढावा आयुक्तांनी रविवारी घेतला. या वेळी कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.