
‘बेस्ट’ उपक्रमाने जाहीर केली गहाळ झालेल्या फोनची यादी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : अनेकदा बसमध्ये घाई-गडबडीत अनेकाचे फोन गहाळ होतात. ज्यांचे फोन फेब्रुवारी २०२३ या महिन्यात गहाळ झाले आहेत, अशा नागरिकांना बेस्ट उपक्रमाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून गहाळ किंवा बसमध्ये हरवलेल्या मोबाईल फोनची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मोबाईल फोन हरवलेला दिनांक, बस क्रमांकाचा मार्ग, मोबाईल फोनचे नाव नमूद केले आहे. त्यामुळे ज्यांचे फोन हरवले आहेत त्यांनी बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधावा आणि मोबाईल फोन १५ एप्रिल २०२३ च्या आधी आपल्या ताब्यात घ्यावेत, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे. तुमचा फोन जर बसमध्ये हरवला असेल, तर बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधावा आणि मोबाईल फोन ताब्यात घ्यावेत, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे. गहाळ वस्तूंची अधिक माहिती बेस्ट उपक्रमाच्या bestundertaking.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही बेस्टने स्पष्ट केले आहे.