अनिश्का जयसिंघानीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

अनिश्का जयसिंघानीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी देण्याच्या आरोपात मुंबई पोलिसांनी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हिला अटक केली आहे. मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने अनिक्षा जयसिंघानीला २१ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अनिक्षाविरोधात लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला.

लाचेची ऑफर
अनिक्षाने काही बुकींची माहितीही अमृता फडणवीस यांच्याकडे मागत मदत करण्याची विनंती केली होती. त्याबदल्यात त्यांना एक कोटीची लाच देण्याची ऑफरही देण्यात आली. त्यामुळे अखेर अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला.


दोन वर्षांपूर्वी भेट
नोव्हेंबर २०२१ मध्ये ही डिझायनर अमृता फडणवीस यांना भेटली होती. यावेळी तिने तिच्या आईचे निधन झाल्यानंतर एकटीनेच घराचा सर्व भार उचलल्याचा दावा केला होता. या पहिल्या भेटीनंतर अनिक्षा ही नंतर अमृता फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जात असे. सागर बंगल्यावरही ती येत असे. या काळात तिने अमृता फडणवीस यांना काही कार्यक्रमांत ड्रेस आणि ज्वेलरी परिधान करण्यासाठी दिली होती.


जयसिंघानीचे गुन्हेगारी कनेक्शन उघड...
अनिल जयसिंघानी हा सट्टेबाज असून तो उल्हासनगरचा रहिवासी आहे. ५ राज्यांत १७ गुन्हे त्याच्या नावावर दाखल असून गेल्या ८ वर्षांपासून तो फरारी आहे. सट्टेबाजी प्रकरणात अनिल जयसिंघानीला तीन वेळा अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी ११ मे २०१९ रोजी जयसिंघानी याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार आठ वर्षांपूर्वी २०१५ मे मध्ये गुजरात पोलिसांनी जयसिंघानी याच्या दोनही घरांवर छापा मारला होता. त्याच्याविरोधात मनी लॉण्डरिंग प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला. पण तब्येतीचे कारण देत तो फरारी झाला होता. त्यानंतर मुंबईतल्या दोन पोलिस ठाण्यांत त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल जयसिंघानी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्याही रडारवर आहे. अहमदाबाद सेशन कोर्टानेही त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. गुजरात ईडीव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, आसाम, मध्य प्रदेशमध्येही त्याचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com