निर्देशांक तेजीच्या लाटेवर स्वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांक तेजीच्या लाटेवर स्वार
निर्देशांक तेजीच्या लाटेवर स्वार

निर्देशांक तेजीच्या लाटेवर स्वार

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ ः अमेरिकेतील फर्स्ट रिपब्लिक बँकेला अर्थसाह्य मिळाल्याने आज (ता. १७) जागतिक शेअर बाजारांमध्ये आलेल्या तेजीच्या लाटेवर स्वार होऊन भारतीय शेअर बाजार निर्देशांकदेखील अर्धा टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. यामुळे ११४.४५ अंश वाढलेला निफ्टी १७ हजारांच्यावर गेला, तर ३५५.०६ अंश वाढलेला सेन्सेक्स ५८ हजारांच्या जवळ पोहोचला. निर्देशांकांची आजची सलग दुसरी तेजी आहे.

अमेरिकेतील अडचणीत आलेल्या बँकेला अर्थसाह्य मिळण्यासोबतच विशेष प्रकारच्या स्टिल उत्पादनावर आधारित प्रोत्साहन देण्याच्या योजनेचा दुसरा टप्पा सरकारने जारी केल्यामुळे पोलाद निर्मिती कंपन्यांच्या शेअरचे भावही आज वाढले. या सर्व वातावरणामुळे आज धातुनिर्मिती कंपन्या, बँका, आयटी आणि बांधकाम व्यवसाय कंपन्यांचे शेअर वाढले. आज भारतीय शेअर बाजारात सुरुवात चांगली झाली. मध्यंतरी थोडा काळ नफावसुली झाली. मात्र, पुन्हा दुपारनंतर तेजीने जोर पकडल्याने निर्देशांक नफ्यातच बंद झाले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५७,९८९.९० अंशांवर, तर निफ्टी १७,१००.०५ अंशांवर बंद झाला.

क्रेडिट स्युईसच्या मागोमाग अमेरिकेतील फर्स्ट रिपब्लिकन बँकेलाही अमेरिकेतील चार मोठ्या बँकांच्या समूहाने ३० अब्ज डॉलरचे साह्य केल्याच्या वृत्तामुळे आज जागतिक शेअर बाजारात तेजी परतली होती; तर अमेरिकेतील आर्थिक आकडे खराब आल्यामुळे तेथे फारशी व्याज दरवाढ होणार नाही, अशी अपेक्षाही वर्तवली जात होती. वाहन निर्मिती, संरक्षण आणि औद्योगिक उत्पादनासाठी लागणाऱ्या विशेष प्रकारच्या स्टील उत्पादनासाठी सरकारने दुसरी पीएलआय योजना आणली असून आज त्यात २७ स्टील कंपन्यांनी सरकारशी ५७ करार केले. त्यामुळे टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया या शेअरचे भाव बी.एस.ई. वर वाढले होते.
---
या शेअर्समध्ये चढ-उतार
आज निफ्टीच्या मुख्य ५० पैकी ३७ शेअरचे भाव वाढले; तर सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी २१ शेअरचे भाव वाढले. निफ्टी अल्पकाळ सतरा हजारांच्या खाली होता. एरव्ही तो दिवसभर सतरा हजारांच्या वरच फिरत होता, तर सेन्सेक्स आज काही काळ ५८ हजारांच्या वर गेला होता. मात्र तो तेथे टिकू शकला नाही, पण आता तो ५८ हजारांच्या घरात आला आहे. निफ्टीमधील एचसीएल टेक, हिंदाल्को, अल्ट्राटेक सिमेंट, यूपीएल, जेएसडब्ल्यू स्टील या शेअरचे भाव दोन ते चार टक्के वाढले; तर सेन्सेक्समधील नेस्ले, टाटा स्टील, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, एअरटेल, एचडीएफसी, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, विप्रो या शेअरचे भाव एक ते सव्वा दोन टक्के वाढले.
---
अमेरिकेची आर्थिक आकडेवारी खराब आल्यामुळे कमी व्याज दरवाढीच्या अपेक्षेत तेजी शक्य आहे. मात्र, शेअरबाजार अजूनही फार मजबूत वाटत नसल्यामुळे काळजी घेणे अपेक्षित आहे.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस