माझी पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीला द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझी पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीला द्या
माझी पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीला द्या

माझी पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीला द्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : गेल्या चार दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. याचदरम्यान खासदार-आमदार यांना पेन्शन देण्यात येते, मग आम्हाला का नाही? हा प्रश्न सातत्याने आंदोलकांकडून विचारला जात आहे. असे असताना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील कार्यालयीन शिपाई अण्णा कोंडू विशे यांनी उदारपणा दाखवला आहे. त्यांना जुन्या पेन्शननुसार मिळणारे मासिक पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई- मेलद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अण्णा विशे यांनी दाखवलेला हा उदार दृष्टिकोन खरोखरच अभिनंदनास्पद आहे. तसेच त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाचा उपयोग शासनात आरोग्यविषयक उपक्रमांना अथवा राज्यातील गरीब दुबळ्या, अंध, दिव्यांग लोकांच्या कल्याणासाठी व्हावा, असेही नमूद केले आहे. हे निवेदन त्यांनी १६ मार्च रोजी दिले आहे. मुरबाड, सोनावळे येथील अण्णा विशे हे सन १९९७ मध्ये आरोग्य विभागात रुजू झाले. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शिपाई म्हणून कामावर हजर झाले. सध्या ते मुरबाड ग्रामीण रुग्णालयात कार्यालयीन शिपाई म्हणून कार्यरत आहेत.
२७ वर्षे शिपाई म्हणून सेवा करणारे अण्णा विशे हे फेब्रुवारी २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार आहे. त्यांना दोन मुले असून तेदेखील स्वतःच्या पायावर खंबीर उभे असून स्थिरस्थावर आहेत. तसेच विशे हे निर्व्यसनी आणि निरामय आरोग्य यामुळे त्यांचा खर्च मर्यादित आहे. त्यातच वडिलोपार्जित शेतकरी असल्याने त्यांनी निवृत्तिवेतन आवश्यक नसल्याचे नमूद करत त्यांना जुन्या पेन्शननुसार मिळणारे मासिक पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात यावे, असा निर्णय त्यांनी घेत, तसे निवेदनही मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.

.....................
सेवानिवृत्ती प्रक्रिया पूर्ण करून शासनातून सेवा मुक्त झाल्यावर आपणास शासनामार्फत कुठल्याही सेवा निवृत्तिवेतनाची आवश्यकता नाही. निवृत्तिवेतनाचा उपयोग शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमांना अथवा गरीब, दुबळ्या, अंध, दिव्यांग लोकांच्या कल्याणासाठी व्हावा, अशी इच्छा आहे. तरी त्यांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निवृत्तिवेतन महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब, दीन-दुबळ्या, दिव्यांग लोकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करावा, अशी विनंती केली आहे.
- अण्णा विशे, शिपाई, शासकीय रुग्णालय, ठाणे