
जांभुळ ग्रामपंचायतीला सुंदर गावाचा बहुमान
टिटवाळा, ता. १८ (बातमीदार) : राज्य सरकारने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेचे रुपांतर २०१६-२०१७ पासून स्मार्ट ग्राम योजना असे केले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीना आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीचा पुरस्कार ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीने पटकावला आहे.
५० लाख रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ठाणे जिल्ह्यात हा पुरस्कार कल्याण तालुक्यातील जांभुळ ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक गुण प्राप्त केल्यामुळे आर. आर. पाटील, जिल्हा सुंदर गाव म्हणून जांभुळ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. ऐतिहासिक अशा कल्याण नगरीतील पंचायत समितीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. आम्ही जांभुळकर, ग्रामस्थ, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे सुवर्णक्षण पाहायला मिळतात, अशी नम्र भावना ग्रामपंचायतीचे कर्तबगार सरपंच परिक्षित पिसाळ यांनी व्यक्त केली.
प्रारंभापासूनच कल्याण पंचायत समितीच्या अंतर्गत येणारे जांभुळ हे गाव आदर्श गाव म्हणून तालुक्यात नावारूपाला येत आहे. याच गावाने आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. गावातील सर्व घटकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत.