पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसाठी वणवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसाठी वणवण
पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसाठी वणवण

पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसाठी वणवण

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : विक्रमगड नगरपंचायतीची पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यास नागरिक उदासीन आहेत. त्यामुळे नगरपंचायतीस सहकार्य होत नसल्याने थकबाकीची रक्कम वाढली आहे. थकीत रक्कमवसुलीसाठी सध्या विक्रमगड नगरपंचायत कर्मचारी भरउन्हात नागरिकांच्या घरी खेटा घालताना दिसत आहेत.
विक्रमगड नगरपंचायतीची घरपट्टी थकीबाकीची रक्कम जवळपास ७० लाखांवर गेली आहे. चालू वर्षीची थकबाकी ३१ लाख आहे. तसेच थकीत पाणीपट्टी ४० लाखांवर; तर चालू वर्षाची थकबाकी रक्कम १० लाखांपर्यंत जाऊन पोहचली आहे. नगरपंचायतीने घंटागाडी गावात फिरवून नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी थकीत रक्कम भरावी अन्यथा कारवाई करण्यांत येईल, अशा सूचना देण्याचे काम चालू केले आहे. मात्र नागरिक त्यास कोणताही प्रतिसाद देत नसल्याने व थकीत रक्कम भरण्यास उदासीन धोरण राबवित असल्याने थकबाकी वाढली आहे. त्यामुळे आता नगरपंचायत प्रशासन थकीत नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलणार आहे. वसुली होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार करणे कठीण होऊन बसलेले आहे; तर पाणीपुरवठा वीजबिलाची रक्कम भरणे जिकिरीचे होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

----------------------
सहकार्य करण्याचे आवाहन
विक्रमगड नगरपंचायतीची लोकसंख्या जवळजवळ १० हजारांच्या आसपास आहे. यामध्ये विक्रमगड शहरासह, टोपलेपाडा, वाकडुचा पाडा, यशवंतनगर या गावांचा समोवश आहेत. थकबाकी भरा अन्यथा कारवाईस सामोरे जा, अशी भूमिका नगरपंचायत प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना थकीत रक्कम भरून नगरपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.