
एसटीच्या सवलतीला उदंड प्रतिसाद
नवीन पनवेल, ता. १८ (वार्ताहर)ः राज्य सरकारने ‘महिला सन्मान योजना’ सुरू करून सर्व प्रकारच्या एसटी बसमध्ये महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. राज्यभरात लागू झालेल्या या योजनेचे पनवेलमध्येही स्वागत झाले असून २,६३४ महिलांनी लाभ घेतला. एसटीला ४८ हजार ४६० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
कायम तोट्यात असलेली एसटी नेहमीच सर्वसामान्यांना चांगली सुविधा देण्यासाठी झटत आहे. आजही ग्रामीण भागाची जीवनदायिनी असलेली ‘लाल परी’ कायम ठेवली आहे. ग्रामीण भागात तर बहुतेक गावांत एसटीशिवाय पर्याय नाही. लांब पल्ल्यासाठी खासगी वाहने परवडत नसल्याने लग्नतिथी, सणवार अशा काळात एसटी हाच पर्याय उपयुक्त ठरत आहे. ज्येष्ठांसाठी खास सवलत, मुलींना मोफत प्रवास, अपंग, अंधांना सवलत अशा विविध योजनांमुळे एसटीला प्रवाशांची कायम पसंती मिळत आहे. अशातच महिलांसाठी आता नव्याने एसटीकडून खास सवलत म्हणून तिकिटात थेट ५० टक्के सवलत दिली आहे. या निर्णयाची कार्यवाही आजपासून एसटी महामंडळाने सुरू केली असून मिनी बस, निमआराम, वातानुकूलित, शयनयान, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या सर्वच बसमध्ये ही योजना लागू झाल्याने महिलांचादेखील प्रतिसाद मिळत आहे.
--------------------------------
एसटीच्या सर्व बसमध्ये महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. ही योजना शुक्रवारपासून लागू झाली आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही वाढ होईल. पनवेल आगाराच्या माध्यमातून चांगली सेवा देण्यात येत आहे.
- विलास गावडे, व्यवस्थापक, पनवेल आगार