
गुढीपाडव्यासाठी बाजारपेठ सजली
वाशी, ता. १८ (बातमीदार) ः मराठी नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या बाजारपेठादेखील सजल्या असून घरोघरी गुढ्यांसाठी लागणारे पंचांग, साखेरच्या गाठ्या, रेशीम वस्त्र, तांबे, पितळ, काशाचा गडू, रांगोळी, पताका, गुढीसाठी बांबूची अशा वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यापासून मराठी वर्षाला सुरुवात होती. यानिमित्ताने घराघरांसमोर डौलाने उंचच-उंच गुढी उभारून सण साजरा केला जातो. मात्र, शहरी भागात इच्छा असूनदेखील घरासमोर अथवा फ्लॅटमध्ये गुढी उभारता येत नाही. अशा ग्राहकांना पर्याय म्हणून छोट्या, आकर्षक गुढी बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना गुढी उभारण्यासाठी जागेची कमतरता भासते, म्हणूनच आता बाजारपेठेत अगदी चार फूट पर्यंत तयार केलेल्या गुढ्या दाखल झाल्या आहेत. याला ग्राहकवर्गाची अधिक पसंतीही मिळत आहे. अगदी चार फुटांपासून तयार असलेली गुढी १५० पासून ३०० रुपयांपर्यंत विकली जात असल्याचे विक्रेते राजीव गुप्ता यांनी सांगितले.
---------------------------------------------
चायना मेड वस्तूंची विक्री
प्लास्टिकच्या छोट्या गुढ्यांची किमत १५० रुपयांपासून पुढे असून मोठ्या गुढ्यांची ३०० रुपयांपासून विक्री होत आहे. त्यातही चायना मेड वस्तूंची विक्री होत आहे. साखरेचे भाव वाढल्याने साखरमाळांचे भाव वाढले असून २० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत या माळा उपलब्ध आहेत. बाजारात केसरी, पांढऱ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाच्या गाठ्या विक्रीस आहेत.