
ग्रामदेवतांच्या जत्रांचा थाटमाट
तुर्भे, बातमीदार
चैता पाखाचे महिन्या मंदी नाग चाफ्याला भरू येती ग... अशी पारंपरिक लोकगीते जेव्हा कानावर पडतात तेव्हा नवी मुंबईतील गावा-गावांमध्ये ग्रामदेवतेच्या जत्रांचा हंगाम सुरू झाल्याचे समजावे. आगरी-कोळी समाजाचे आराध्य दैवत म्हणून कार्ला गडावर असलेल्या एकवीरा मातेची जत्रा झाली, की त्यापाठोपाठ नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील ग्रामदेवतांच्या जत्रांचा थाटामाटात आगमनाला सुरुवात होत असून आजही जुन्या चालीरीती सांभाळत ग्रामदैवतेचा मान जोपासला जातोय.
--------------------------------------
ठाणे जिल्ह्यातील एक तालुका असलेल्या नवी मुंबई शहरात साधारणपणे ३५ ते ४५ वर्षांपासून चैत्र महिन्यातील देवीची जत्रा होते. ढोल-ताशांचा गजर, नाच-गाण्यांची बहार आणि आलेल्या पाहुण्यांसहित तांदळाच्या भाकरी आणि झणझणीत मटणाच्या जेवणाचा बेत आजही या जत्रेचे आकर्षण आहे. आजही जुन्या रीतीभाती पाळूनच जत्रा उत्सव साजरा केला जातो. उरण-पनवेल तसेच रायगड जिल्ह्यातील तालुक्यात ग्रामदैवत तसेच कुलदैवतांच्या जत्रांना सुरुवात होते. फुंडे येथील घुरबादेवीच्या यात्रेनंतर जसखार येथील रत्नेश्वरी, करंजा येथील द्रोणागिरी, नवीन शेवे येथील शांतेश्वरी, कोप्रोली तसेच या यात्रांमध्ये देवींच्या यात्रेसोबत कुलदैवतांच्याही यात्रा भरवल्या जात आहेत. यापैकी जसखार, करंजा तसेच नवीन शेवे या गावात देवींच्या यात्रा दोन दिवसांच्या असतात. यामध्ये एक दिवस यात्रा; तर दुसरा दिवस हा पालखी सोहळ्याचा असतो. या यात्रा व पालखी सोहळ्यांसाठी जिल्ह्यासह मुंबई, ठाणे आदी ठिकाणावरही भाविक येतात. तालुक्यातील बारा गावातील यात्रा एकाच दिवशी साजऱ्या केल्या जातात. यामध्ये गावातील गावदेवतांच्या या जत्रा होतात. या यात्रांमध्ये देवाला बोकडाचा मान देण्याची तसेच काठ्या नाचवण्याचीही प्रथा आहे.
-----------------------------------------------
‘हेलकोट काठी’चा सोहळा आकर्षण
जत्रेच्या पूर्वसंध्येला गावातून ढोल-ताशांच्या गजरात, मिरवणुकीत गावाच्या वेशीवर असलेल्या गावदेवीच्या देवळापर्यंत वाजतगाजत निशाण नेण्याची प्रथा आहे. या निशाणाला ‘हेलकोट काठी’ असे संबोधले जाते. हा एक २० ते ३० फूट लांब बांबू असतो. त्या काठीला रंगीबेरंगी कापडाची रिबीन गुंडाळून वरच्या टोकाला मोरपीस व छोटी हातघंटी बांधलेली असते. त्या वेळी देवीला नैवेद्य सहाणेवर दाखवला जात असल्याने या विधीला ‘सहाण भरणे’ असेदेखील म्हणतात.
---------------------------
भाकरीसोबत मटणाचा बेत
तरुण पिढी जत्रेच्या देवीच्या नावाने जागरण म्हणून देवी-देवतांच्या जुन्या गाण्यांचे सादरीकरण करतात; तर जत्रेच्या दुसऱ्या दिवशी गावातील गृहिणी पहाटेच चुली पेटवून येणाऱ्या पाहुण्यांसाठी तांदळाच्या भाकरीसोबत मटणाचा झणझणीत रश्श्याचा बेत होतो.