
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी
घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) : शहरात अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून फेरीवाल्यांनी पथारी पसरण्याआधीच पालिकेने धडक कारवाई करावी, अशी मागणी मोकळा श्वास या संस्थेने घाटकोपर येथील पालिका कार्यालय, तसेच पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. १३ मार्च रोजी पालिकेच्या एन विभाग कार्यालयातील सहायक पालिका आयुक्त संजय सोनवणे यांनी घाटकोपर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. यात यापुढेही ती सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मोकळा श्वास संस्थेचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी ही कारवाई भविष्यात अखंडपणे सुरू ठेवून घाटकोपरवासीयांना मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी मागणी पालिका अधिकाऱ्यांकडे केलेल्या लेखी निवेदनात केली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर अंतरावर फेरीवाल्यांना न्यायालयाकडून मज्जाव आहे; तर दुसरीकडे या भागात खाद्य पदार्थांच्या गाड्याही वाढत आहेत; मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई नीटपणे होत नसल्याची टीका सावंत यांनी केली आहे.