डहाणूचा विकास आराखडा मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूचा विकास आराखडा मंजूर
डहाणूचा विकास आराखडा मंजूर

डहाणूचा विकास आराखडा मंजूर

sakal_logo
By

नारायण पाटील, डहाणू
पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातील डहाणू नगर परिषदेचा विकास आराखडा अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर करण्यात आला आहे. याबाबत नगरविकास विभागाने १३ मार्च रोजी अधिसूचना काढली आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने २० जून १९९१ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार डहाणू तालुका पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदशील असल्याचे घोषित केले होते. त्याप्रमाणे डहाणू नगर परिषद क्षेत्राचा पहिला प्रारूप विकास आराखडा ४ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यातील वगळलेल्या भागाचा २०१६ मध्ये समावेश करून त्याला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर ५ जानेवारी २०१७ रोजी राज्य सरकारने हा प्रारूप विकास आराखडा केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. देशभरातून अशा प्रकारचे २८ विकास आराखडे केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाकडे मंजुरी विनाप्रलंबित असताना २२ फेब्रुवारी २०२१ रोजी केंद्र सरकारने हा प्रारूप विकास आराखडा मंजूर करण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले. तसेच हा आराखडा सक्षम प्राधिकरणाकडून मंजूर करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डहाणू शहराचा विकास आराखडा मंजुरीचा ठराव डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने केल्यानंतर तो राज्याच्या नगरविकास खात्याकडे प्रलंबित होता. यासंदर्भात नगर विकास विभागाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांला मंजुरी दिल्यानंतर कोकण विभागाच्या राजपत्रात १३ मार्च रोजी नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. या अधिसूचनेची अंमलबजावणी तीस दिवसानंतर होणार असल्याचे राजपत्रात म्हटले आहे.
....
एकत्रित विकास यंत्रणेची मागणी
डहाणू तालुक्याच्या उर्वरित भागाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या डहाणू तालुका प्रादेशिक विकास आराखडा मंजुरीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात सर्व समावेशक हस्तांतरित होणारे विकास हक्क, चटई क्षेत्र निर्देशांक व इमारतीची उंची वाढविण्याची मुभा, मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर एकत्रित विकास यंत्रणा व प्रोत्साहन नियमावलीची अंमलबजावणी करण्याची ही मागणी पुढे येत आहे.
....
विकास आराखडा मंजूर होणे ही डहाणूच्या उद्योग जगतासाठी ही आनंदाची बाब आहे. आता खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच डहाणू तालुक्याचा प्रादेशिक विकास आराखडाही लवकरच मंजूर होणार आहे.
- रवींद्र फाटक, उद्योजक, डहाणू
....
डहाणू नगरपरिषदेचा विकास आराखडा मंजुरीसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली; पण आता डहाणू शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार.
मिहीर शहा, माजी नगराध्यक्ष, डहाणू