शोभिवंत रंगीबेरंगी टोपल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शोभिवंत रंगीबेरंगी टोपल्या
शोभिवंत रंगीबेरंगी टोपल्या

शोभिवंत रंगीबेरंगी टोपल्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : बांबूच्या किमती वाढल्‍याने अलिबागमधील टोपली व्यावसायिकांनी पर्याय काढून रंगीबेरंगी फायबर वायरचा वापर करत टोपल्या, परड्या बनवण्यास सुरुवात केली आहे. कमी खर्चात वेळेची बचत करत तयार होणाऱ्या या वस्तू टिकाऊ असल्‍याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत सुचलेली ही कल्पना व्यावसायात उतरवून पोयनाड येथील अक्षय जाधव याने आपला व्यवसाय भरभराटीस आणला. साधारण ४० टक्के बांबू आणि ६० टक्के फायबर वायरचा वापर करून तो घरगुती वापराच्या वस्तू तयार करतो. पूर्वी तो बांबूपासून दिवसाला दोन ते तीन टोपल्या तयार करायचा, आता दिवसाला पाच ते सहा टोपल्या तो एकटा तयार करतो. मोठी टोपली असेल तर तीन टोपल्‍या सहज होतात. यात आईसह पत्नीची मदत होत असल्‍याचे अक्षय सांगतो.
फायरबच्या वायरपासून तयार केलेल्‍या रंगीबेरंगी टोपल्या, परड्या, फुलदाण्या बांबूपेक्षा अधिक मजबूत आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असल्याने दिवसेंदिवस त्‍यांना मागणी वाढत आहेत. वेगवेगळ्या वस्‍तू तयार करण्यासाठी तो साताऱ्याहून घाऊक प्रमाणात फायबरची वायर आणतो. तोंडलीचे मांडव, टोमॅटोची रोपे बांधण्यासाठी फायदेशीर म्‍हणून पूर्वी शेतकऱ्यांकडून फायबर वायर मागणी असायची, मात्र ही वायर कालांतराने ताणली जात असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा वापर कमी केला आहे. टाकाऊ वायरच्या वापरापासून अक्षयच्या मुलीने एक टोपली विणली. ही टोपली लगेच विकली गेल्यानंतर विविध रंगातील वायर आणून अक्षयने टोपल्या बनवण्यास सुरुवात केली. पाहता पाहता व्यवसायात नफा होऊ लागल्यानंतर त्याने टोपल्या बनवण्यासाठी फायबर वायरचा वापर वाढवला. बांबूच्या तुलनेत यासाठी खर्च कमी येत असल्‍याने आणि ग्राहकांची मागणी वाढल्‍याने त्‍यांनी विविध वस्‍तू तयार करण्यास सुरुवात केली आहे.

बांबूच्या बारीक काड्या (कांदी) आणि पट्ट्या (पायंडे) तयार करण्यासाठी खूप मेहनत करावी लागायची. फायबरची वायर वापरल्याने आता मेहनत कमी लागते. ४० टक्के बांबूचा वापर उर्वरित ६० टक्के वायर वापरल्याने टोपलीला पारंपरिक लुक येतो. या टोपल्या अधिक टिकाऊ आणि आकर्षक आहेत. त्यामुळे घरातील सजावटीसाठी त्यांचा वापर आवर्जून केला जात आहे.
- अक्षय जाधव, टोपली कारागीर, पोयनाड