दिव्यांगांना महापालिका देणार प्रकाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांना महापालिका देणार प्रकाश
दिव्यांगांना महापालिका देणार प्रकाश

दिव्यांगांना महापालिका देणार प्रकाश

sakal_logo
By

प्रसाद जोशी, वसई
स्वतःवर विश्वास आणि जिंकण्याची ताकद घेऊन दिव्यांग बंधू-भगिनी घराबाहेर पडतात स्वतःचा व्यवसाय अथवा नोकरी करतात; मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात सर्वांत मोठी समस्या ही आर्थिक पाठबळ असते. अशातच वसई विरार महापालिकेने अपंग कल्याणकारी योजनेसाठी भरीव आर्थिक तरतूद आणि व्यापक जनजागृतीचा ध्यास घेतला आहे. यामुळे महापालिकेच्या योजनांचा प्रकाश दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचणार आहे.

दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावे म्हणून स्वयंरोजगार, व्यवसाय यासह अधिकाधिक सुविधा देण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. यासाठी महापालिका अर्थसंकल्पात निधीची तरतूद करते. यंदा गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक तरतूद करण्यात आली आहे. वसई तालुक्यात सुमारे पाच हजार दिव्यांग बांधव वास्तव्य करत आहेत. दिव्यांग कल्याणाकरीता असलेला विविध योजनांतर्गत दिव्यांगाची असलेल्या टक्केवारी नुसार प्रतीमहा अनुदान, तसेच व्यवसाय कर्जे देणे, दिव्यांग खेळाडुंना प्रोत्साहन अनुदाने, व्याधीग्रस्त दिव्यांगाना अर्थसहाय्य, संस्थांना अनुदान तसेच भौतिकोपचार साधन, दिव्यांग मेळावे असे उपक्रम महापालिकेतर्फे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे याचा लाभ दिव्यांग बांधवाना होणार आहे.
वसई विरार महापालिका स्वयंरोजगारासाठी ५० हजार, १८ वर्षांवरील गतिमंद व्यक्तीच्या संगोपनाकरिता वार्षिक २४ हजार रुपये, तर ८० ते १०० टक्के अपंगत्व असणाऱ्या मासिक २ हजार अनुदानाचा लाभ, ६० टक्के अपंगत्व असणाऱ्या अंध, अस्थिव्यंग, बहुविकलांग, कर्णबधीर, मूकबधिर दिव्यांग व्यक्तींना १५०० रुपये, ४० ते ४९ टक्के दिव्यांगांना एक हजार मासिक अनुदान देण्यात येणार आहे.
दिव्यांग बांधवांना व्यायाम करता यावा यासाठी सुशोभित केलेल्या उद्यानात भौतिकोपचाराची क्रॉस अँड झिरो, ऑर्बिटर क्लांबर, व्हर्टिकल शोल्डर, ब्रिज लॅण्डर यासह अन्य उपकरणे लावली जात आहेत. तसेच दिव्यांगांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना देखील अनुदान दिले जाणार आहे. तसेच महापालिकेकडून दिव्यांग नागरिकांना कृत्रिम अवयव व सहाय्यक साधने वितरीत करण्यात येणार असून याचा लाभ दिव्यांगाना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
--------------------
वर्ष- तरतूद
२०२०-२१ - चार कोटी ५३ लाख
२०२२-२३ - १० कोटी ३२ लाख
२०२३-२४ - ११ कोटी १० लाख
----------------
दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ सर्व दिव्यांग बांधवांना घेता यावा अर्थसंकल्पातदेखील भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त
------------------
दिव्यांग बांधवदेखील अनेक खेळात आपली चुणूक दाखवतात. अशा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी खेळाडूंना तालुकास्तरावर १० हजार, जिल्हास्तरीय २५ हजार व राज्यस्तर ५० हजार व आंतरराष्ट्रीय एक लाख रुपये प्रोत्साहनपर रकमेचा लाभदेखील महापालिकेकडून मिळणार आहे.
-----------------
वसई विरार महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात अधिक निधी प्रस्तावित केला असल्याने याचा लाभ मिळेल; मात्र याची जनजागृती प्रशासनाकडून अधिक व्यापक स्वरूपात केली जावी. यामुळे कोणीही सुविधा व योजनेपासून वंचित राहणार नाही.
- देविदास केंगार, संस्थापक अध्यक्ष, अपंग जनशक्ती संस्था