
विरार पूर्वेकडील स्कायवॉकचा खांब निखळला
विरार, ता. १८ (बातमीदार) : वसई तालुक्यात विरार आणि वसईमध्ये एमएमआरडीएने प्रवाशांसाठी स्कायवॉक तयार केले आहेत. या स्कायवॉककडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून सध्या हे स्कायवॉक लव्हरपॉईंट झाले आहेत. शिवाय स्कायवॉकला लावलेले पत्रेही चोरून नेण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता. १७) वादळी वाऱ्यामुळे स्कायवॉकचा आधाराचा खांब निखळला असून तो धोकादायक स्थितीत लोंबकळत आहे.
विरार पूर्वेकडील स्कायवॉकच्या सुरिक्षिततेसाठी कोणतीही काळजी घेण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे. या स्कायवॉकवर सुरक्षा कर्मचारी नसल्याने कठड्याला लावलेले पत्रे राजरोसपणे चोरांनी काढून नेले आहेत. दोन दिवसांपासून सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे कठड्याचा खांब निखळला असून तो बाजूच्या मिर्झा शॉपिंग सेंटरच्या खिडकीला अडकला आहे. या स्कायवॉकखाली रिक्षा स्टॅन्ड आहे. तसेच रेल्वेस्थानकासमोर हा स्कायवॉक असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी असते. खांब जर खाली पडला असता तर मोठा अपघात झाला असता. सुदैवाने खांब खिडकीला अडकल्याने अपघात टळला आहे.
याबाबत वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार आणि बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने सदर खांब हटवण्याचे आदेश दिले आहेत. निखळलेल्या खांबाच्या बाजूचा पडण्याच्या स्थितीत असलेला खांबही काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.