सुट्यांच्या हंगामामुळे उद्यानांकडे कूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुट्यांच्या हंगामामुळे उद्यानांकडे कूच
सुट्यांच्या हंगामामुळे उद्यानांकडे कूच

सुट्यांच्या हंगामामुळे उद्यानांकडे कूच

sakal_logo
By

जुईनगर, ता. १८ (बातमीदार) : सार्वजनिक जागेतील नागरिकांचा वावर आणि वर्दळ कमी करण्यासाठी महापालिकेने उद्यानांच्या वेळांवर आणलेली बंधने अद्याप शिथिल केलेली नाहीत. अशातच सध्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे मोबाईल तसेच व्हिडीओ गेमच्या आहारी गेलेल्या मुलांना उद्याने तसेच मैदाने पर्याय ठरणार असल्याने पालिकेने उद्यानातील प्रवेशाच्या वेळा वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक उद्याने आणि हरित पट्टे असणारे नवी मुंबई हे एमएमआर क्षेत्रातील एकमेव शहर आहे. या शहराच्या निर्मितीच्या नियोजनात सिडकोने नोडनिहाय उद्याने निर्माण केली आहेत. पालिकेने उद्यानांचे समीकरण अबाधित ठेवताना त्यात नव्या उद्यानांची भर घातली आहे. या उद्यानांसोबत मैदाने आणि हरित पट्टे निर्माण करण्यावर पालिकेचा भर आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर फारशी पर्यटनस्थळे नसलेल्या नवी मुंबईकरांना उद्याने विरंगुळ्याचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेनेदेखील शहरातील नागरिक आणि बच्चेकंपनीसाठी वेळ घालवण्यासाठी उद्याने विकसित केली आहेत; पण कोविडमुळे या उद्यानांच्या वेळा कमी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास अशा काही उद्यानांच्या वेळा असल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. त्यामुळे उद्याने जर जास्त वेळ खुली राहिली, तर उद्यानांमध्ये अधिक वेळ घालवून त्यांना लागलेले मोबाईल आणि व्हिडीओ गेमचे व्यसन सुटेल, अशी अपेक्षा पालकांना आहे.
---------------------------------
नोकरदार महिलांना सकाळी उद्यानात येणे वेळेअभावी शक्य नसते. संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर उद्यानांमध्ये फेरफटका मारायला गेल्यानंतर अनेकदा उद्याने बंद असतात. रात्रीची तरी किमान दोन तास वेळेत वाढ करावी.
- सुश्मिता पाटील, नोकरदार महिला
------------------------------------------------------
नवी मुंबईतील सार्वजनिक उद्यान आणि पार्क यांच्या प्रवेशाची वेळ वाढवावी, अशी मागणी विविध घटकांकडून होत आहे. याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल.
- नितीन नार्वेकर, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका
-----–---------------------------------