गुढीपाडवा निमित्त बाजारपेठ सजली; रेडिमेड गुढीला पसंती

गुढीपाडवा निमित्त बाजारपेठ सजली; रेडिमेड गुढीला पसंती

रेडीमेड गुढ्यांचा गोडवा!
मांगल्याचा सोहळा साजरा करण्यासाठी शोभायात्रांची जय्यत तयारी

भारती बारस्कर, मुंबई
मराठी वर्षातील पहिला सण म्हणून गुढीपाडवा चैत्र महिन्यात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा आनंद आणि मांगल्याचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात येते. त्यानिमित्त दादर, परळ आणि लालबागमधील बाजारपेठा फुलून गेल्या असून आकाराला लहान व दिसायला सुंदर असलेल्या रेडीमेड गुढीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

--

मुंबईतील बाजार सध्या गुढीपाडव्यानिमित्तचे साहित्य आणि वस्तूंनी भरून गेला आहे. गुढीसाठी लागणाऱ्या नव्या काठीसह रेशमी-तलम वस्त्र, लहान तांब्‍या, कृत्रिम फुलांचा हार, पाने, माळा आणि साखरगाठींची खरेदी सुरू झाली आहे. पारंपरिक सजावट केलेल्या नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी रेडीमेड गुढीविक्रीसाठी उपलब्ध असून साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी बाजारात दिसून येत आहे. लहान, पण दिसायला सुंदर असलेल्या रेडीमेड गुढीला ग्राहकांची जास्त पसंती आहे. दुसरीकडे शोभायात्रांचीही जल्लोषात तयारी सुरू झाली आहे.
गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ढोल-ताशांच्या गजरात मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढण्याची परंपरा रूढ असल्याने मुंबईतील अनेक मंडळे तयारीत व्यग्र आहेत. गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी दादर, परळ आणि लालबागसारख्या मराठमोळी संस्कृती असलेल्या भागांमधील दुकाने साहित्यांनी सजली आहेत. नऊ इंचाची रेडीमेड गुढी ८० ते १०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. एक फुटाची गुढी १२० ते १५० रुपयांना मिळत आहे. दीड फुटाच्या गुढीची किंमत २०० ते २५० रुपये आहे. सजवलेल्या गुढी दर्जा व आकारानुसार ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गुढीच्या काठीवर साखरगाठीचा हार घालण्यात येत असल्याने त्यांना अधिक महत्त्व असते. साखरगाठींच्या हारांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. पिवळा, गुलाबी, हिरवा आणि पांढरा अशा रंगीत साखरगाठींच्या हाराला ग्राहकांची अधिक पसंती आहे, असे सौभाग्य वस्तू भांडारतर्फे सांगण्यात आले. शोभायात्रेसाठी परिधान करण्यात येणारी नऊवारी साडी, फेटा आणि सदरा खरेदी करण्यासाठीही दुकानात गर्दी होत आहे.
मुंबईतील नायगाव, दादर, परळ, लालबाग, शिवडी, गिरगाव आदी भागांमधील मंडळे नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळा पोशाख परिधान करून ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढतात. एक महिना आधीपासूनच शोभायात्रेची रूपरेषा ठरविण्यात येते. त्याचीच तयारी सध्या जोरात सुरू आहे. मराठमोळ्या लोकवस्तीत सध्या ढोल-ताशा वाजवण्याचा सराव रंगू लागला आहे. कुणी शोभायात्रेत समाजप्रबोधन करणारे सांस्कृतिक विषयांवर आधारित जनजागृती करणारे देखावे साकारत आहेत.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त वाहन, घर, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूस मोबाईल इत्यादी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे नागरिकांना आकर्षित करण्यासाठी दुकान, शोरूम व ऑनलाईन खरेदीवर मोठ्या प्रमाणात ऑफर ठेवण्यात आल्या आहेत.

नऊवारी साड्यांना पसंती
हल्ली सण, उत्सव आणि विविध समारंभांत अनेक कार्यक्रमांमध्ये नऊवारी साडीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे सर्वत्रच नऊवारीचा साज पाहायला मिळतो. गुढीपाडव्यानिमित्त नऊवारी साडी व त्यावर शोभेल, असा साजशृंगार करण्याकडे महिलांचा वाढता कल आहे. नऊवारी साडीमध्ये अनेक प्रकार, आकर्षक रंग व डिझाईन असे पर्याय उपलब्ध आहेत. त्यात पैठणीसह पेशवाई व नऊवारी साड्यांना अधिक मागणी आहे, असे दादरमधील सुहासिनी श्रुंगार दुकानदारांनी सांगितले.

आपल्या संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्दिष्टाने आणि आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी शिवडीत शोभायात्रा काढण्यात येते. त्यात सहभागी होणाऱ्या बच्चेकंपनीपासून वयोवृद्ध पारंपरिक पोशाख परिधान करतात. समाजप्रबोधनासाठी सामाजिक संदेश दिला जातो.
- ब्रह्मदेव आतकरी, संस्थापक अध्यक्ष, स्पंदन युवा प्रतिष्ठान संचालित हिंदू नववर्ष स्वागत समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com