आशा स्वयंसेविकांच्या योगदानाचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशा स्वयंसेविकांच्या योगदानाचा सन्मान
आशा स्वयंसेविकांच्या योगदानाचा सन्मान

आशा स्वयंसेविकांच्या योगदानाचा सन्मान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ ः कोविडसारख्या कठीण काळात लसीकरणाचे काम चोख बजावण्यात नवी मुंबई महापालिका नेहमीच राज्यात अव्वल राहिली आहे. या मोहिमांमध्ये घराघरांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचे योगदान सर्वोच्च असून नवी मुंबई महापालिकेने ‘आशा दिवस’ साजरा करत त्यांचा सन्मान केला आहे.
राष्ट्रीय लसीकरण दिवसाचे औचित्य साधून सीबीडी बेलापूर येथे पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नुकताच आशा दिवस साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बाल आरोग्य, नियमित लसीकरण, पल्स पोलिओ लसीकरण, साथरोग सर्वेक्षण, आरोग्य शिक्षण अशा विविध कार्यक्षेत्रांत राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या २३ नागरी आरोग्य केंद्रांतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रातील सर्वोत्कृष्ट ए. एन. एम. झिरो ऑडिट पॉइंट असणारे नागरी आरोग्य केंद्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या लिपिकांनादेखील सन्मानित करण्यात आले. या वेळी २०२२-२३ मध्ये नवी मुंबई महापालिका रुग्णालयात २५०० हून अधिक महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील स्त्रीरोग विभागप्रमुख आणि नेरूळ रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.
------------------------
निकषांच्या आधारे निवड
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्काराच्या २०२२-२३ करिता ललिता यादव, अनिसा शेख व रुक्मिणी तेली पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. ५२ विविध निकषांच्या आधारे या स्वयंसेविकांची निवड करण्यात आली. तसेच महापालिका मुख्यालयातील लसीकरण क्षेत्र सनियंत्रक क्रांती म्हात्रे यांनादेखील या वेळी सन्मानित करण्यात आले.