अंबरनाथच्या विकासासाठी ७७५ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथच्या विकासासाठी ७७५ कोटी
अंबरनाथच्या विकासासाठी ७७५ कोटी

अंबरनाथच्या विकासासाठी ७७५ कोटी

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : अंबरनाथ शहराच्या विकासासाठी आतापर्यंत ७७५ कोटींचा निधी दिला असून त्यात शिवमंदिर परिसर विकासासाठी १३८ कोटींचा निधी दिला आहे. जे बोलतो ते करून दाखवतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फौऊंडेशनच्या माध्यमातून शिवमंदिर परिसरात सुरू असलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या कार्यक्रमात शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच अंबरनाथला आलो आहे, शिवमंदिर परिसर विकासासाठी निधी देईन, असा शब्द दिला होता, मात्र मागील सरकारच्या काळात लागणारा निधी देऊ शकलो नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला, मात्र मुख्यमंत्री होताच अंबरनाथच्या विविध विकासकामांसाठी तब्बल ७७५ कोटींचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. अंबरनाथ शहर आता मोठ्या शहरांशी स्पर्धा करू लागले आहे, त्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी पाठपुरावा करत निधी मिळवला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फौऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे आयोजन केले जाते, यामध्ये जागतिक कीर्तीचे कलाकार फेस्टिवलमध्ये त्यांच्या अदाकारीने अंबरनाथवासीयांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्राचीन मंदिरे गडकिल्ल्यांसाठी भरघोस आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अंबरनाथच्या विकासाकडे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान केला. शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या योजना आणि त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा करणाऱ्या पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मान केला गेला. तत्पूर्वी शिवमंदिरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.


---
शिवमंदिर आर्ट फेस्टिवल
शिवमंदिर आर्ट फेस्टिवल १६ ते १९ मार्च असा चार दिवस होणार होता, मात्र फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पाऊस आल्याने नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला होता, या कारणामुळे फेस्टिवलचा कालावधी एक दिवसाने वाढवला जाणार आहे, सर्वसामान्यांचे सरकार सत्तेत असल्याने नागरिकांचा आवाज ऐकला जाणार असल्याचे सूतोवाच यावेळी एकनाथ शिंदे केले.