शेगवा लागवडीतून ग्रामीण उन्नतीवर भर

शेगवा लागवडीतून ग्रामीण उन्नतीवर भर

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २० : शेवग्‍याच्या शेंगांना बाजारात मोठी मागणी असून आरोग्‍यवर्धक म्‍हणून त्‍या आवर्जून खाल्‍या जातात. शेवग्‍याच्या काही वाणापासून चांगले उत्पादन मिळवता येते. कोकणात शेवग्‍याच्या पिकासाठी पोषक वातावरण आहे, त्याचबरोबर मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जवळच असल्याने रायगड जिल्हा परिषदेकडून यंदा ९ लाख २९ हजार २९१ इतकी शेवगा जातीची रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
जिल्ह्यात मुरूड, रोहा तालुक्यातील शेतकरी शेवगा शेती करतात; मात्र, तिचे स्वरूप विस्कळित आहे. यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच शासकीय स्तरावर होत आहे. शेतकऱ्यांना रोपे देऊन तयार होणाऱ्या शेंगा घाऊक बाजारात विकता याव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्नशील असून चालू हंगामात ही रोपे शेतकऱ्यांना लागवडीसाठी देण्यात येणार आहेत.
सामाजिक वनीकरण, वन विभागाकडून शेवग्‍याची रोपे तयार केली जात आहेत. या लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक उन्नती साधणे शक्य होईल. शेवगा ही औषधी वनस्पती आहे. नवजात मातांचे तसेच कुपोषण रोखण्यासाठी शेवग्‍याचा पौष्टिक आहारात समावेश केला जातो. शेवग्याच्या शेंगांना बाजारात मोठी मागणी असल्‍याने रायगड जिल्हा परिषदेतर्फे चालू आर्थिक वर्षात ग्रामीण भागात शेगवा लागवडीचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

प्रत्‍येक कुटुंबाला दोन रोपे
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला २ शेवग्याची रोपे याप्रमाणे ४ लाख ५४ हजार २८ कुटुंबांना ९ लाख ८ हजार ५६ रोपे पुरविण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये १३ हजार १५ रोपे, अंगणवाड्यांमध्ये ६ हजार ५१० रोपे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २७०, उपकेंद्रांमध्ये १ हजार ४४० शेवग्याची रोपे लावण्यात येणार आहेत.

बहुगुणी शेवगा
शेवग्‍याची पाने, फुले व शेंगा यांची भाजी करतात. शेवग्याच्या पानांपासून शक्तिवर्धक पेये तयार होते, हे पेय कुपोषणावर मात करण्यासाठी फायदेशीर आहे. आयुर्वेदातही शेवग्याच्या शेंगांचे महत्त्व सांगितले आहे. शेवग्याच्या शेंगामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट तसेच कॅल्शिअम लोह व फॉस्फरस ही खनिजे असतात तसेच अ व क जीवनसत्त्वे असतात. शेवग्याच्या शेंगामधील जीवनसत्वामुळे रातांधळेपणा कमी होतो. तसेच अशक्तपणा कमी करण्यासाठी शेवग्‍याच्या शेंगाचा आहारात आवर्जून वापर केला जातो.


लागवड कुठे करावी?
शेवग्याची लागवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगर उताराच्या हलक्या जमिनीही उपयुक्त ठरते. शेवग्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असली तरी हलका ते मध्यम पाण्याचा निचरा उत्तम होणाऱ्या जमिनीत फायदेशीर ठरते. पाणी धरून ठेवणारी जमीन पिकास मानवत नाही. शिवाय निचरा न होणाऱ्या काळ्या जमिनीत शेवगा लागवड करू नये.

कुपोषण रोखणे आणि आरोग्‍यवर्धक म्‍हणून शेवगा लागवडीवर भर दिला जात आहे. यातून ग्रामीण भागात आर्थिक उन्नतीही साधता येईल, हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे. यातून ९ लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ठ्ये ठेवले असून त्‍या दृष्टीने तयारी सुरू आहे.

- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com