भारडा शाळेने १३२ वर्षानंतर मुलींसाठी दरवाजे उघडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारडा शाळेने १३२ वर्षानंतर  मुलींसाठी दरवाजे उघडले
भारडा शाळेने १३२ वर्षानंतर मुलींसाठी दरवाजे उघडले

भारडा शाळेने १३२ वर्षानंतर मुलींसाठी दरवाजे उघडले

sakal_logo
By

१३२ वर्षांनंतर शाळेत मुलींचा किलबिलाट!
फक्त मुलांसाठी असलेल्या फोर्टमधील भारडा हायस्कूलचे दरवाजे विद्यार्थिनींसाठी खुले

मिलिंद तांबे ः मुंबई
फोर्टमधील ऑल-बॉईज भारडा न्यू हायस्कूलने चालू शैक्षणिक वर्षात मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. १३२ वर्षांनंतर शाळा प्रशासनाने पहिल्या तुकडीचे स्वागत केले. सध्या कनिष्ठ महाविद्यालयात २९ विद्यार्थिनी आहेत. शाळेत १६ मुलींना प्रवेश देण्यात आला आहे.
--

जानेवारी १८९१ मध्ये जलभाई दोराबजी भारडा आणि कैकोबाद बेहरामजी मर्झबान यांनी दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर भारडा न्यू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. तब्बल १३२ वर्षांच्या देदीप्यमान इतिहासात शाळेने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू विजय मर्चंट, पॉली उम्रीगर, नरी कॉन्ट्रॅक्टर, प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सुधीर के. ठाकरे इत्यादींसह अनेकांनी भारडा शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. आतापर्यंत फक्त मुलांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारडा न्यू हायस्कूलमध्ये आता विद्यार्थिनीही शिकणार आहेत. सध्या शाळेत १६ मुलींना प्रवेश देण्यात आला असून येत्या शैक्षणिक वर्षांत त्यांची संख्या वाढेल, असा विश्वास ट्रस्टने व्यक्त केला.
भारडा मर्झबान एज्युकेशनल ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. शहेरनाज नलवाला यांनी सांगितले, की कनिष्ठ महाविद्यालयात फार पूर्वीपासून सहशिक्षण सुरू आहे; परंतु शाळा फक्त मुलांसाठी होती. तिथे मुलींना प्रवेश नव्हता. मुलांची शाळा ठेवण्यामागची कारणे काहीही असली, तरी आज ती फारशी सुसंगत नाहीत. म्हणून शाळेत मुलांसह मुलींनाही प्रवेश का देऊ नये, असा विचार केला आणि धोरण बदलले. ट्रस्टने तीन वर्षांपूर्वी आपले जुने धोरण बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शाळा सह-शैक्षणिक संस्थेत रूपांतरित करण्याचे धोरण तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आले; मात्र कोविड साथीच्या प्रसारामुळे अंमलबजावणीला विलंब झाला. कोविड नियंत्रणात आल्यानंतर आपण जसे सामान्य स्थितीत आलो तसे गेल्या वर्षीपासून मुलींसाठी प्रवेश सुरू केले. आगामी शैक्षणिक वर्षात आणखी मुली शाळेत दाखल होतील अशी आमची अपेक्षा आहे, असेही डॉ. नलवाला म्हणाल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता लुईस यांनी सांगितले, की नव्या धोरणामुळे मुलांना कोणतीही अडचण आली नाही. आम्ही त्यांना संवेदनशील बनवण्याचा आणि मुलींच्या बाबतीत ते अधिक अनुकूल कसे होऊ शकतात याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. शिक्षक नियमितपणे मुलांशी त्याबद्दल बोलत आहेत. मुलींना अधिक प्रोत्साहन मिळावे आणि मुलांनीही बदल स्वीकारावा यासाठी आम्ही त्यांच्यापौकी काहींना वर्ग मॉनिटर बनवले आहे, असेही त्या म्हणाल्या.

शाळेत आम्ही बदल केले असले, तरी पालकांपर्यंत त्याची पुरेशी माहिती पोचलेली नाही. त्यामुळे ज्यांची मुले आमच्या शाळेमध्ये आहेत, त्याव्यतिरिक्त इतर पालक आपल्या मुलींसाठी शाळेमध्ये प्रवेशासाठी आलेले नाहीत. आम्ही हळूहळू बदल करत आहोत आणि आता त्यात यश येत आहे. १६ पैकी बहुसंख्य मुली सध्या असलेल्या विद्यार्थ्यांच्याच बहिणी आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात आम्हाला मुली वाढवायच्या असून त्यांचा प्रतिसाद अपेक्षित आहे.
- विनिता लुईस, मुख्याध्यापिका

ऐतिहासिक महत्त्व
- भारडा शाळेची इमारत हेरिटेज आहे. तिचे विशेष रूप जपण्याचा प्रयत्न शाळेकडून सुरू आहे.
- शाळेच्या मध्यभागी जुनी विहीर आहे. तिचे पाणी सध्या पिण्यासाठी वापरले जात नसले, तरी तिचे जतन करण्यात येत आहे.
- शाळेमध्ये वस्तुसंग्रहालयही आहे. त्यात मगर, सुसर आणि विविध पक्ष्‍यांचे सांगाडे जतन करून ठेवण्यात आले आहेत. शिवाय माकड, शार्क, बैल, घोडा आदी प्राण्यांची हाडे, कवट्या व दात जतन करून ठेवण्यात आले आहेत. शिवाय जुने पैसेही तिथे बघायला मिळतात.