
सोनसाखळी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कळवा, ता. १८ (बातमीदार) : मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वयोवृद्ध महिलांना लक्ष्य करून त्यांचा पाठलाग करत गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे प्रकार घडत होते. गेल्या १० ते १२ दिवसांत घडलेल्या चार घटना घडल्यामुळे मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा-दिवा प्रकटीकरण पथकाचे पोलिस अधिकारी शेळके व बोरसे यांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे गत २५ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान दिवा, खर्डी, शिळफाटा आदी ठिकाणी आरोपी चोरी करून जात असल्याची माहिती प्राप्त केली होती. त्यानुसार शनिवारी (ता. ११) रात्री पोलिसांनी सापळा रचत ओला चालक आरोपी कमलेश रामचंद्र गुप्ता (वय ३३) याला निर्मळनगरी खर्डी येथून अटक केली. अधिक तपास केला असता त्याच्यावर चोरीचे ४ गुन्हे दाखल असून त्याच्याकडून १ लाख ९१ हजार १४८ रुपये किमतीचे ६१ ग्रॅम सोने व ६० किमतीची दुचाकी ताब्यात घेण्यात आली. ही कामगिरी परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व मुंब्रा दिवा प्रकटीकरण पथकाने पार पाडली.