परतीचा प्रवास सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परतीचा प्रवास सुरू
परतीचा प्रवास सुरू

परतीचा प्रवास सुरू

sakal_logo
By

शहापूर, ता. १८ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांबाबत विधानसभेत केलेले निवेदन व आज शासनाचे परिपत्रक घेऊन ठाणे जिल्हाधिकारी यांनी वाशिंद येथे येऊन मोर्चेकऱ्यांची व नेते जे. पी. गावित यांची भेट घेतली. या वेळी मोर्चेकऱ्यांसमोर जे. पी. गावित यांनी आपल्या ७० टक्के मागण्या शासनाने तात्काळ मान्य केल्याने तसेच उर्वरित मागण्यांसाठी शासनाने एक समिती तयार केली असून यातील काही मागण्या केंद्र स्तरावरील आहेत त्यांचाही पाठपुरावा सदर समिती करेल, असे शासनाने जाहीर केल्याने आज हा मोर्चा स्थगित करून मोर्चेकरी माघारी फिरत असल्याचे गावित यांनी जाहीर केले.
या हजारो मोर्चेकऱ्यांना परत गावी सोडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महपालिकेच्या १० बस; तर खासगी ५ बस वाशिंद ते नाशिक रोड एक स्पेशल ट्रेन व मोर्चेकऱ्यांच्या २०० हून अधिक गाड्या अशी व्यवस्था करण्यात आली होती. आज दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी मोर्चेकऱ्यांना घेऊन एक विशेष ट्रेन वासिंद स्टेशनहून नाशिकसाठी रवाना झाली. आंदोलक शेतकरी यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याचा आनंद व्यक्त केला, परंतु नाशिक ते वासिंद लाँग मार्चदरम्यान अनेक शेतकरी जखमी झाले. त्यातच या आंदोलनादरम्यान शुक्रवारी पुंडलिक जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने सर्व मोर्चेकरी शांत होते.

---
आमच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही नाशिक ते मुंबई लाँग मार्च सुरू केला. आज सात दिवसांत शेतकरी, कष्टकऱ्यांचे खूप हाल झाले. वयोवृद्ध, गरोदर माता व लहान मुलांचेही खूप हाल झाले. काही दुर्दैवी घटनादेखील घडल्या. यात राज्य शासनाची चूक आहे. आम्ही मोर्चा घेऊन निघालो, तेव्हा शासनाने नाशिक येथेच आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर एवढा मोठा प्रसंग उद्‍भवला नसता.
- जे. पी. गावित, शेतकरी नेते.

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार महसूल विभागाशी निगडित ज्या काही मागण्या असतील व अन्य विषयांवरील काही मागण्या असतील, त्याबाबत शासन परिपत्रक मी आंदोलकर्त्यांचे नेते व शिष्टमंडळास दिले असून समाधानकारक चर्चा झाल्याने आज हा लाँग मार्च परत आपापल्या गावी जात आहे.
- अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी, ठाणे