एसटीच्या हिरकणी बसचा मेकओव्हर

एसटीच्या हिरकणी बसचा मेकओव्हर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : मुंबई-पुणेकरांच्या पसंतीस उतरलेली निमआराम श्रेणीतील हिरकणी (एशियाड) बस बंद होण्याची चर्चा असताना तिचा ‘मेकओव्हर’ करण्याचे काम एसटीच्या दापोडीतील मध्यवर्ती कार्यशाळेत सुरू आहे. त्यानुसार लवकरच २०० हिरकणी बस नव्या रूपात रस्त्यावर धावणार आहेत. या बसमध्ये आधीपेक्षा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. या बसची लांबी १२ मीटर असून, स्टडी लॅम्प, चार्जिंगची सुविधा नव्याने यामध्ये देण्यात आली आहे.

मुंबई-पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना किफायतशीर म्हणून हिरकरणी बसची ओळख आहे. या बसचा मेकओव्हर केल्यानंतर त्यातील पहिली बस पुणे-दादर मार्गावर सोडण्यात आली. उर्वरित बसची बांधणी दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत वेगाने सुरू असून येत्या दोनतीन महिन्यांत या सर्व बस रस्त्यावर धावताना दिसतील, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

बसमध्ये प्रवाशांसाठी मॅगझिन पाऊच, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी होल्डर तसेच बॅग हुक आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. बसची देखभाल-दुरुस्ती सुलभ व्हावी यासाठी बसच्या फ्लोअरवरील विविध ठिकाणी हॅन्डल दिले आहेत. बसची रंगसंगती पॅपिरस पांढरा, पानांचा हिरवा आणि शुद्ध भगवा रंग अशा आकर्षक रंगात आहे. तसेच यापुढे पूर्वीप्रमाणेच जांभळ्या व पांढऱ्या रंगसंगतीत हिरकणी नियोजित आहे. तसेच बॅटरी बॉक्स, प्रवासी सामान कक्ष, स्पेअर व्हील बॅकेट, एफआरपी बोनेट, आदींच्या सुलभ हाताळणीसाठी आणि धुळीपासून संरक्षण होण्यासाठी लॉक कव्हर बसवण्यात आले आहेत.

बसची वैशिष्ट्ये
- बस आकर्षक दिसावी म्हणून आतील बाजूस थर्मोप्लास्टिक सीट
- बसमध्ये स्वयंचलित जॅक आणि नाईफ प्रकारचे दरवाजे आतील बाजूने उघडणार
- प्रवाशांच्या संरक्षणासाठी स्क्रू दिसू नयेत यासाठी त्यावर कॅप कव्हर
- बस आकर्षक दिसावी यासाठी ‘डिसेन्सी फ्रेम’, चालकासमोर डॅशबोर्ड
- आकर्षक डिझाईन असलेले ‘हिरकणी’ स्टीकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com