रिंपलचा साथीदार असण्याची शंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिंपलचा साथीदार असण्याची शंका
रिंपलचा साथीदार असण्याची शंका

रिंपलचा साथीदार असण्याची शंका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : आईच्या मृतदेहाचे तुकडे करून घरात अनेक ठिकाणी लपवण्याचा आरोप असणाऱ्या रिंपल जैन या मुलीची पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस येत आहेत. रिंपल जैनने आईचा मृत्यू नैसर्गिक असून तिच्यावर आईच्या हत्येचा संशय येऊ नये यासाठी मृतदेहाचे तुकडे केल्याचे पोलिस तपासात सांगितले आहे. लालबागमधील इब्राहिम कासीम चाळीत घडलेला गुन्हा मंगळवारी (ता. १४) घडकीस आला. रिंपलला आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्यास कुणी तरी मदत केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रिंपलचे मामा सुरेश पोरवाल यांचा जवाब पोलिसांनी याप्रकरणी नोंदवला आहे. सुरेश पोरवाल १४ मार्चला रिंपलच्या भेटीसाठी गेले होते; मात्र रिंपलने त्यांना घरात घेतले नाही. त्या वेळी रिंपलने आई झोपली असल्याचे सांगितले. पोरवाल यांनी तिला दार उघडायला सांगितले. बहिणीला भेटायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा रिंपलने आई काही दिवसांपूर्वी जिन्यावरून कोसळल्याने तिला अर्धांगवायूचा झटका आल्याचे सांगितले. आई घरी नाही, ती उपचारांसाठी कानपूरला गेली असल्याचे रिंपल म्हणाली. ती खोटे बोलत असल्याचा संशय आल्याने पोरवाल काळाचौकी पोलिस ठाण्यात गेले आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला, असा घटनाक्रम पोरवाल यांनी सांगितला.

गुन्ह्यात मदतीचा संशय
पोरवाल यांनी आपल्या जबाबात रिंपल स्वत:चे निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वीणाची हत्या करताना आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना तिला कोणी तरी मदत केली असावी, असा संशय पोरवाल यांनी व्यक्त केला आहे. वीणा यांचा मृत्यू २७ डिसेंबरला झाला असण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी चाळीतील रहिवाशांना त्या शेवटच्या दिसल्या होत्या.