
सायबर चोरांचा वकिलाला गंडा
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : पतंजलीच्या हरिद्वार येथील योगा सेंटरमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नवी मुंबईतील एका महिला वकिलाला सायबर टोळीने ३२ हजारांचा गंडा घातला आहे. न्हावा-शेवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
उलवे भागात राहणाऱ्या पीडित महिलेला आईसह पतंजलीच्या हरिद्वार येथील योगा सेंटरमध्ये उपचारासाठी जायचे होते. त्यासाठी ४ मार्च रोजी गुगलवरील एका मोबाईलवर त्यांनी संपर्क साधला होता. या वेळी योगपीठमधील पॅकेजच्या ऑनलाईन बुकिंगसाठी दिवसाचे ४ हजार रुपये सांगण्यात आले होते. तसेच ८ दिवसांचे ३२,३०० रुपये भरावे लागतील, असे सांगून गुगल पेद्वारे १० हजार रुपये भरण्यास सांगितले होते. त्यामुळे पीडित महिलेने सायबर चोरांच्या नंबरवर गुगल पे द्वारे १० हजार रुपये पाठवून दिले होते. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा मेसेज पाठवून उर्वरित २२,३०० रुपये पाठवण्याचे सांगितले. त्यामुळे या महिलेने २२,३०० रुपयेदेखील ऑनलाईन पाठवून दिले. मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी आणखीन पैशांची मागणी करण्यात आल्याने महिला वकिलाला संशय आल्याने योगपीठच्या वेबसाईटवर चौकशी केली असता बुकिंग झाली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणी न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.