
कामोठे खाडी किनारा असुरक्षित
कामोठे, ता. १९ (बातमीदार) : शहरातील सेक्टर ३६ येथील खाडीकिनारी गर्दुल्ले, मद्यपींचा वावर वाढला आहे. तसेच बेकायदा व्यावसायिकांचे पेव फुटले असल्याने फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या आबालवृद्धांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे खा़डीकिनाऱ्यावर पोलिस चौकी सुरू करण्यासाठी कामोठे कॉलनी फोरमने पुढाकार घेतला आहे.
वैयक्तिक स्वार्थासाठी खाडीकिनाराच्या तिवरांच्या झाडांची कत्तल करून बेकायदा टपरी, भंगाराची दुकाने सुरू करण्याचे प्रकार कोमोठे खाडीकिनाऱ्यावर झाले आहेत. याबाबतच्या तक्रारींनंतर महसूल विभागाने काही दिवसांपूर्वी या ठिकाणी कारवाई केली होती. मात्र, पुन्हा काही समाजकंटकांनी डोके वर काढले असून सेक्टर ३६ येथील खाडीकिनारी गर्दुल्ले, मद्यपींचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे खाडीकिनारी संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना असुरक्षित वाटत आहे. शिवाय या भागात नागरिकांची तुरळक वर्दळ असल्याने टेम्पोतून घातक रासायनिक द्रव्यदेखील सोडले जात आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या कांदळवनास धोका निर्माण झाल्याने या परिसरात पोलिस चौकी उभारणीची मागणी कामोठे कॉलनी फोरमने वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कांबळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.