
जनजागृतीतून एनसीबीकडून वर्धापन दिन साजरा
मुंबई, ता. २० : केंद्रीय अमली पदार्थविरोधी कार्यालयाच्या (एनसीबी) मुंबई शाखेच्या वतीने जनजागृतीवर आधारित विविध कार्यक्रम घेऊन ३८ वा वर्धापनदिन साजरा केला. विशेष म्हणजे ८५५.३३ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
देशाला अमली पदार्थमुक्त समाजाकडे नेण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. एनसीबी मुंबई विभागाने घेतलेल्या विविध कार्यक्रमात अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेची विशेष मोहीम सुरू केली. मुंबईच्या अधिकाऱ्यांनी पर्यटकांनी गजबजलेल्या गेट वे ऑफ इंडिया येथे अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थित नागरिकांना अमली पदार्थांपासून दूर राहण्यासह त्यांचे कुटुंब आणि मित्रांमध्येही दुष्परिणामांबद्दल प्रबोधन करण्याचे आवाहन करण्यात आले; तर दुसरीकडे एनसीबी मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या वारसास्थळावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथेही या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवाशांना अमली पदार्थमुक्त जीवन जगण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा प्रचार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.