
अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आझाद मैदानात उपोषण
मुंबई (बातमीदार) : वरळी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. मुजोर प्रशासकीय कारभाराविरोधात सुनीता रणधीर या सामाजिक कार्यकर्त्यांसह आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. वरळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात भ्रष्टाचारप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांवर सरसकट गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी. तसेच भ्रष्टाचारप्रकरणी तत्कालीन उपविभागीय अभियंता हेही या प्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सुनीता रणधीर यांचे बुधवार (ता. १५) पासून उपोषण सुरू आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.