मराठी भाषेसमोरील आव्हाने पेलण्यास नवी पिढी सक्षम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषेसमोरील आव्हाने 
पेलण्यास नवी पिढी सक्षम
मराठी भाषेसमोरील आव्हाने पेलण्यास नवी पिढी सक्षम

मराठी भाषेसमोरील आव्हाने पेलण्यास नवी पिढी सक्षम

sakal_logo
By

मुलुंड, ता. १९ (बातमीदार) : काही कवी, लेखक आणि साहित्यिकांनी मराठी भाषेवर आक्रमण होत असल्याची ओरड बंद करावी. मी महाविद्यालयात असताना तीस वर्षांपूर्वी मराठी वाङ्‍मय मंडळाचे कार्यक्रम करताना जो उत्साह होता, तसाच जोश आजच्या युवा पिढीमध्ये काठोकाठ भरलेला आहे. मराठी भाषेसमोरील आव्हाने पेलण्यास आणि टिकवण्यात नवी पिढी सक्षम असल्याचे गौरवोद्‍गार लेखक आशुतोष भालेराव यांनी काढले.

जोशी-बेडेकर महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक होत्या. या वेळी उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे, डॉ. प्रियवंदा टोकेकर, डॉ. महेश पाटील, प्रा. राजश्री जाधव माने, मराठी भाषा आणि साहित्य विभाग प्रमुख डॉ. संतोष लक्ष्मण राणे आदी मान्यवर उपस्थित होते. भालेराव पुढे म्हणाले की, भाषा ही प्रवाही असते. ती सातत्याने बदलत राहते. इतर भाषेतील नवनवीन शब्द घेऊन ती समृद्ध होते. आजच्या तरुणांनी मराठी पुस्तके वाचली पाहिजेत. स्वतःला व्यक्त होऊ देण्यासाठी लेखनही पाहिजे.

प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक म्हणाल्या की, मराठी भाषेला समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. या समृद्ध भाषेचे आपण पाईक आहोत, ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपेश महाडिक यांनी केले.