
वार्तापत्र
बदलत्या हवामानामुळे मिरची लागवड धोक्यात
पालघर, प्रकाश पाटील
पालघर जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे रात्री व सकाळी थंड वातावरण; तर दुपारी उष्ण वाऱ्याच्या झळा बसत आहेत. या विचित्र वातावरणाचा मिरची लागवडीवर मोठा परिणाम होत आहे. थ्रिप्स, माईट्स, पांढरी माशी, उपद्रवी कीटकांचा मिरची लागवटीवर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. काही मिरची लागवड शेतकऱ्यांनी अनेक कीटकनाशके फवारूनही उपद्रव थांबत नसल्याने मिरचीची रोपे काढून टाकण्यात आली आहेत. उपद्रव वाढत चालल्याने उत्पन्नात घट येऊन तेथील शेतकऱ्यांचे पन्नास कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता मिरची लागवड शेतकऱ्याकडून वर्तवली जात आहे. शासनाच्या कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात कीटकनाशके पुरवावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पालघर जिल्ह्यात मिरची लागवड एक हजार ७८ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे. भोपळी मिरचीची लागवड डहाणूमध्ये ९९३ हेक्टर, पालघरमध्ये ३६६ हेक्टर, तलासरी ३३५ हेक्टर, वाडा १२३ हेक्टर, विक्रमगड ४८ हेक्टर, वसई ३३ हेक्टर, मोखाडा २३ हेक्टर आणि जव्हारमध्ये २० हेक्टर याप्रमाणे मिरचीची लागवड करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड ऑक्टोबरमध्ये; तर काहींनी नोव्हेंबर महिन्यात लागवड केली आहे. मिरचीचे उत्पादन मे महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पाऊस लांबला, तर जूनच्या मध्यांपर्यंत सुरू असते. मिरचीची लागवड झाल्यानंतर काही ठिकाणी सुरुवातीपासूनच थ्रिप्स, माईटस, पांढरी माशी या उपद्रवी कीटकांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. मिरचीला फुलोरा आल्यानंतर फुलांमध्ये या कीटकांचा उपद्रव सुरू झाला आहे. जैविक तसेच रासायनिक कीटकनाशक फवारणीनंतरदेखील या कीटकांचा नायनाट होत नाही. त्यामुळे रोपांमधील प्रतिकारशक्ती कमी झाल्याने विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढवून उत्पन्नात घट येऊ लागली आहे.
केळवे, माहीम, तारापूर, चिंचणी, डहाणू, वाणगाव या भागामध्ये मिरची लागवडीनंतरचे दोन खुडेही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. एकरी पंधरा ते वीस टन उत्पन्न देणाऱ्या मिरचीचे उत्पादन घटून ते तीन ते पाच टनापर्यंत मर्यादित झालेले आहे. आता तर आणखी उष्णता वाढल्याने मिरचीमध्ये मोठी घट होणार आहे, अशी धास्ती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मिरची उत्पादनाचा खरा हंगाम फेब्रुवारी ते मे अखेरपर्यंत सुरू असतो; मात्र सध्याची परिस्थिती पाहता रोगराईमुळे अनेक बागायतदार आणि मिरचीची लागवड उपटून टाकावी लागली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना एकरी दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जिल्ह्यातील मिरची उत्पादकांचे किमान ५० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांकडून जिल्हाध्यक्ष, कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत.