
एच३एन२च्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
पालघर, ता. १९ (बातमीदार) : सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे; त्यातच ‘एच ३एन२’बाधीत रुग्णही आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच पार पडली. एच३एन२च्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, त्वरित उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे ‘एच ३एन२’बाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी लक्षणे जाणवल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत. तसेच आश्रम शाळेत जर एखाद्या बालकाला लक्षणे असतील, तर त्यास विलगीकरणात ठेवावे, लक्षणे असलेल्या नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय बोदाडे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके उपस्थित होते.
....
एकही रुग्ण नाही
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी ‘एच३एन२’च्या सध्यास्थितीबाबत माहिती दिली. सध्या जिल्ह्यात ‘एच३एन२’चा एकही रुग्ण आढळलेला नाही. पण आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगत पूर्व तयारीबाबत माहिती दिली.
...
यंत्रणा सतर्क
जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांच्या तपासण्या व उपचार करण्याबाबत सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. तसेच खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनीही असे रुग्ण आढळल्यास त्यांची नोंद शासकीय यंत्रणकडे करावी. ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, अंगदुखी यासारखी लक्षणे जाणवल्यास त्वरित नजीकच्या उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
....
काय करावे
साबण व स्वच्छ पाण्याने वारंवार होत धुवा
पोष्टिक आहार घ्या
धूम्रपान टाळा
पुरेशी झोप, विश्रांती घ्या
भरपूर पाणी प्या
लिंबू, आवळा, मोसंबी, मंत्री, हिरव्या पालेभाज्या अशा आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा.
...
हे करू नका
हस्तांदोलन
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
लक्षणे असतील, तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका