महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासन सज्ज
महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासन सज्ज

महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासन सज्ज

sakal_logo
By

कासा, ता. १९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रा जवळ पंधरा दिवसांवर आली आहे. या यात्रेसाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून यात्रेसाठी शनिवारी पोलिस उपअधीक्षक संजीव पिंपळे यांनी महालक्ष्मी येथे भेट देत यात्रेच्या उपायोजनेसंबंधी पाहणी करत आढावा बैठक घेतली.
महालक्ष्मी यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, गुजरात राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस, महालक्ष्मी ट्रस्ट, महसूल विभाग आणि इतर विभाग अधिकारी वर्ग कामाला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी डहाणू तहसीलदारांनी गटविकास अधिकारी, पोलिस, महसूल, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, तसेच ट्रस्ट व दुकानदार व ग्रामस्थ यांच्याबरोबर बैठक घेऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला होता.
यात्रेचा मुख्य प्रवेश रस्ता ३० फुटी रुंदीचा तर आतील रस्ता २५ फूट रुंदीचा असावा असे ठरले. अनेक दुकानदारांनी अतिक्रमण केले असल्याने ते चार दिवसांत काढून टाकण्याच्या आदेश दिले होते. या आदेशाचे पालन झाले का नाही याची पाहणी पिंपळे यांनी केली. तसेच महसूल विभागाने अतिक्रमण झालेल्या जागेवर आखणी केली असून गुढीपाडव्यानंतर प्रशासनातर्फे कारवाईस सुरुवात केली जाईल असे सांगण्यात आले. या बैठकीस संजीव पिंपळे यांच्यासह कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी श्रीकांत शिंदे, डहाणू पोलिस अधिकारी नामदेव बंडगर, संदीप पाटील, महालक्ष्मी ट्रस्टचे कर्मचारी वर्ग, महालक्ष्मी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, पुजारी, दुकानदार उपस्थित होते.