पाण्यासाठी खिसा रिकामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्यासाठी खिसा रिकामा
पाण्यासाठी खिसा रिकामा

पाण्यासाठी खिसा रिकामा

sakal_logo
By

घणसोली, ता.१९ (बातमीदार)ः नवी मुंबईतील घणसोली विभागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशातच बुधवारी जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी कमी दाबानेच पाणी पुरवठा होत विकतच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
हक्काचे धरण असूनही नवी मुंबई महापालिकेतील अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्याच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. अशातच घणसोली सारख्या विभागातील दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या तसेच सुरू असलेली बेकायदा बांधकामांमध्ये घेतलेल्या अनधिकृत जोडण्यांमुळे पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे विभागात सध्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशातच जलवाहिनी दुरुस्तीसाठी बुधवारी (ता. १५) बंद ठेवण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यामुळे ही समस्या अधिकच जाणवत आहे. मात्र, या शटडाऊनला आता चार दिवस उलटून गेले तरी पाणी सुरळीत येत नसल्याने घणसोली विभागातील अनंत नगर, शंकरबुवा वाडी, म्हात्रे आळी, टेतर आळी परिसरात टॅंकर आणि विकतच्या पाण्याचा आधार घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तसेच पाणी पुरवठ्यातील अनियमित पणामुळे ज्या ठिकाणी दोन ते तीन वेळा पाणी येत होते. तिथे आता दिवसातून एकदाच पाणी येत असल्याने महिला वर्गाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-----------------------------------
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बुधवारी शटडाऊन असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, पाणी कमी सोडले जात असल्याने पाणीपुरवठा कधीपर्यंत सुरळीत होईल, याबद्दल काही अंदाज नाही.
-नीलेश मोरे, अभियंता पाणीपुरवठा विभाग, घणसोली
-------------------------------------
घणसोली विभागामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच आहे. त्यामुळे महापालिकेने विभागाला मिळणाऱ्या पाणीसाठ्याची क्षमता वाढवण्यासाठी गरज आहे. जेणेकरून पाणीटंचाई उद्भवणार नाही.
-नितीन नाईक, विभाग अध्यक्ष, घणसोली
-------------------------------------
चार दिवसांपासून घणसोली विभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कामावर जायचं की पाणी भरण्यासाठी टँकरची वाट बघायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-वर्षा लोखंडे, महिला